चंद्रकांत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना इतर वाहिन्यांना मुलाखत देण्याचे आव्हान


पुणे – सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनलॉक मुलाखतीची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. आज या मुलाखतीचा दुसरा भाग सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यावर ही मुलाखत तर मॅचफिक्सिंगसारखीच, असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सामनामध्ये उद्धव ठाकरे यांची मुलाखत म्हणजे एक प्रकारे मॅचफिक्सिंगच आहे. हिम्मत असेल तर त्यांनी इतर वृत्त वाहिन्यांनाही मुलाखत द्यावी आणि त्यांच्या संपादकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी. दरम्यान, उद्धव ठाकरे यांना त्यांनी पुन्हा एकदा घरामध्ये बसणारे मुख्यमंत्री असा टोला लगावला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या पुण्यामध्ये असून त्यांनी राज्यातील कोरोनाच्या स्थितीवर भाष्य करताना सांगितले की, राज्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. काळजी करण्यासारखे काही नसल्याचे सांगितले जात असले तरी काळजी करण्यासारखे खूप काही आहे. राज्यातील परिस्थिती भयावह आहे. तसेच सध्या दोन मुख्यमंत्री आहेत. एक मुख्यमंत्री मातोश्रीत बसून राज्य चालवत आहेत. तर दुसरे महाराष्ट्रभर फिरून महाराष्ट्र चालवत आहेत, आता तुम्हीच ओळखा ते कोण आहेत, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.