‘त्या’ वटवृक्षाला वाचविण्यासाठी नितीन गडकरींनी बदलला महामार्गाचा नकाशा

सांगली जिल्ह्यातील भोसे गाव येथील 400 वर्ष जुने वटवृक्ष सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. रत्नागिरी – कोल्हापूर – मिरज – सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचा सर्व्हिस रोड या झाडाच्या जवळून जातो. त्यामुळे हे झाड तोडण्यात येणार होते. मात्र पर्यावरणावादी कार्यकर्ते आणि तेथील गावकऱ्यांनी या निर्णयाला जोरदार विरोध केल्यानंतर आता हे झाड न तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाच्या नकाशामध्ये बदल करत प्रोजेक्ट पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील याबाबत नितीन गडकरींना पत्र लिहिले होते.

सांगलीतील चारशे वर्षांचा वटवृक्ष वाचविण्यासाठी पर्यावरणमंत्र्यांची केंद्राला पत्राद्वारे विनंती

आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली होती. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी सांगली जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन हा वटवृक्ष वाचविण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना दिल्या होत्या.

आदित्य ठाकरे म्हणाले होते की, राज्याच्या पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासन व्यापक कार्य करीत आहे. वृक्षसंवर्धनही त्याअनुषंगाने फार महत्त्वाचे आहे. सांगली जिल्ह्यातील संबंधित वटवृक्ष पुरातन असून त्याचे जतन होणे गरजेचे आहे.