सांगलीतील चारशे वर्षांचा वटवृक्ष वाचविण्यासाठी पर्यावरणमंत्र्यांची केंद्राला पत्राद्वारे विनंती


मुंबई : मौजे भोसे (जि. सांगली) येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये येणारा चारशे वर्ष जुना असलेला वटवृक्ष वाचविण्याबाबत राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी सांगली जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन हा वटवृक्ष वाचविण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना दिल्या.

आदित्य ठाकरे म्हणाले, राज्याच्या पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासन व्यापक कार्य करीत आहे. वृक्षसंवर्धनही त्याअनुषंगाने फार महत्त्वाचे आहे. सांगली जिल्ह्यातील संबंधित वटवृक्ष पुरातन असून त्याचे जतन होणे गरजेचे आहे.

केंद्रीय आदित्य गडकरी यांना लिहिलेल्या पत्रात आदित्य ठाकरे म्हणाले की, आपल्या विभागामार्फत रत्नागिरी – कोल्हापूर – मिरज – सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ चे काम सुरु आहे. या नियोजित रस्त्याच्या कामामुळे परिसरातील शेतकरी बांधव आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. याबद्दल आदित्य ठाकरे यांनी आभार व्यक्त केले.

आदित्य ठाकरेंनी नितीन गडकरींना लिहिले पत्र

तथापि, मिरज ते पंढरपूर या शहरांच्या दरम्यान हा महामार्ग मोजे भोसे (तालुका मिरज, जि.सांगली) या गावातून देखील जातो. मोजे भोसे गावातील गट क्र. ४३६ येथे यल्लमा देवीचे पुरातन मंदिर असून या मंदिरासमोरच सुमारे ४०० वर्षापूर्वीचा महाकाय वटवृक्ष आहे. त्याचा विस्तार सुमारे ४०० चौ.मी. इतका व्यापक आहे. हा वटवृक्ष त्या परिसरातील एक ऐतिहासिक ठेवा तर आहेच, त्याचबरोबर ते वटवाघुळ आणि इतर दुर्मिळ पक्षी यांच्याकरिता नैसर्गिक निवासस्थान देखील आहे.

तथापि, नियोजित राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ च्या कामामुळे या पुरातन वटवृक्षास बाधा पोहोचत असल्याने वटवृक्ष तोडावे लागेल किंवा पर्यायी जागेवरुन रस्ता करावा लागेल असे मिरज उपविभागीय अधिकारी यांच्या अहवालात नमूद केलेले आहे. या वटवृक्षाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता तसेच परिसरातील पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासाचा विचार करता मोजे भोसे येथील संबंधित जागेवरील महामार्गाचे संरेखन काही प्रमाणात बदलून वटवृक्षाचे जतन होण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती आदित्य ठाकरे यांनी केली आहे.