पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात 25% कपात, वर्षा गायकवाड यांची माहिती

कोरोना व्हायरस महामारी संकटामुळे अद्याप शाळा-महाविद्यालय सुरू झालेली नाही. सर्वसाधरणपणे जून-जुलैमध्ये शाळा सुरू होत असतात. मात्र अद्याप शाळा प्रत्यक्षात शाळा सुरू झालेल्या नाहीत. याच पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली की, कमी केलेल्या अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधक परिक्षक यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे. मुलांच्या मनात तणाव राहू नये, त्यांना दडपण येऊ नये म्हणून हा निर्णय हा निर्णय घेण्यात आला आहे.

शाळा प्रत्यक्षात अद्याप सुरू झालेल्या नसल्या तरी ऑनलाईन माध्यमातून मुलांचे शिक्षण मात्र सुरू आहे. मात्र ऑनलाईन शिकताना मुलांवर ताण पडू नये म्हणून अभ्यासक्रमात कपात करण्यात आली आहे. पाठ्यक्रम कमी करण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या प्रस्तावास शासनाने देखील मान्यता दिली आहे.