संजय राऊत यांनी शेअर केला उद्धव ठाकरेंच्या अनलॉक मुलाखतीचा तिसरा प्रोमो


मुंबई – सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अनलॉक मुलाखत घेतली आहे. पण संजय राऊत पूर्ण मुलाखत रिलीज करण्यापूर्वी ट्विटरवर याचे प्रोमो शेअर करत त्याबद्दलची उत्सुकता वाढवताना दिसत आहे. दरम्यान संजय राऊत यांनी मुलाखतीचा तिसरा प्रोमो शेअर केला आहे. यावेळच्या प्रोमोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझी मुलाखत सुरु असतानाच सरकार पाडा असे आव्हानच दिले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात तीन चाकी सरकार, मग केंद्रात किती चाकी आहे? अशी विचारणा करत उद्धव ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला तीन चाकी सरकार म्हणत टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना संजय राऊत यांनी शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये दिसत आहेत. तसेच राष्ट्रीय राजकारणावर भाष्य करताना, आत्ता तुम्हाला चीन नको आहे, पण कालांतराने हिंदी-चिनी भाई भाई होणार नाही का?, असा सवाल विचारत आहेत. आपल्या मुख्यमंत्री पदावर यावेळी त्यांनी बोलताना, मी साठाव्या वर्षी मुख्यमंत्री असलो तरी याच’साठी’ केला होता अट्टहास असे नाही आहे. हा योगायोग असल्याचे सांगितले आहे. २५ आणि २६ जुलै रोजी दोन भागांमध्ये संजय राऊत यांनी घेतलेली ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे.

Loading RSS Feed