नितीन राऊतांची नाचक्की; वीज कंपन्यांवर परस्पर केलेल्या नियुक्त्या रद्द


मुंबई : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये कुरबुरी सुरु असल्याच्या चर्चांना अधोरखित करणारी आणखी एक घटना समोर आली असून वीज कंपन्यांवर राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या अशासकीय सदस्यांच्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काही दिवसांपूर्वी वीज कंपन्यांवर अशासकीय व्यक्तींच्या नियुक्त्या केल्या होत्या. या नियुक्त्या त्यांनी कोणाशीही चर्चा न करता, परस्पर केल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर त्यानंतर नितीन राऊत यांची दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याचे समोर आले होते. पण आता वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी रद्द करण्यात आल्या आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वीज कंपन्यांवर परस्पर अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या नितीन राऊत यांनी सर्वांना अंधारात ठेवून केल्या होत्या. यामध्ये महापारेषण, महावितरण आणि होल्डींग कंपन्यांवरील १६ सदस्यांचा समावेश होता. या सगळ्यानंतर काँग्रेसमधीलच काही नेत्यांनी नितीन राऊत यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या सदस्यांच्या नियुक्तीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आसीम गुप्ता यांनी मंजुरी दिली नव्हती.