मध्य प्रदेशातील भाजप नेत्याचा दावा; राम मंदिराच्या निर्मितीला सुरुवात झाल्यावर संपेल कोरोना


भोपाळ – देशातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालले आहे. त्यातच देशातील १२ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दररोज प्रचंड प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. देशातील वातावरण कोरोनामुळे काहीसे चिंतेच दिसत असतानाच भाजपचे नेते व मध्य प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षांनी एक वक्तव्य केले आहे. राम मंदिराच्या निर्मितीला सुरूवात झाल्यानंतर देशातील कोरोना महामारीचा अंत होईल असे, वक्तव्य विधानसभा अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांनी केले आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने एएनआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने दिले आहे.

लवकरच राम मंदिराच्या उभारणीला सुरूवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार असून, त्यासाठीची तयारी देखील सुरू झाली. राम मंदिराच्या उभारणीची चर्चा सुरू असताना भाजपचे नेते आणि मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांनी एक वक्तव्य केले आहे. मानव जातीच्या कल्याणासाठी आणि राक्षसांना मारण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांनी त्यावेळी पूनर्जन्म घेतला होता. राम मंदिराचे बांधकाम सुरू होताच देशभरात पसरलेली कोरोनाची महामारी नष्ट होण्यासही सुरूवात होईल, असे शर्मा यांनी म्हटले आहे. फक्त भारतच नाही, तर संपूर्ण जग कोरोनामुळे त्रस्त झाले आहे. आम्ही केवळ सोशल डिस्टन्सिगच पाळत नाही, तर देवांचे नामस्मरणही करत आहोत. राम मंदिर बांधण्याचे सर्वोच्च न्यायालयानेच आदेश दिले असल्याचे शर्मा म्हणाले.