लवकरच सुरु होणार जिम, शॉपिंग मॉल, स्विमिंग पूल; आरोग्यमंत्र्यांचे संकेत


मुंबई – तब्बल चार महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या जिम, शॉपिंग मॉल्स आणि स्विमिंग पूल सुरु करण्यास लवकरच परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत पत्रकार परिषदेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी म्हटले की, राज्य सरकार जिम, शॉपिंग मॉल आणि स्विमिंग पूल सुरु करण्याबाबत विचार करत आहे. जनतेच्या आरोग्यासाठी जिम हे आवश्यक असल्यामुळे काही नियम-अटींच्या शर्तीवर स्विमिंग पूल, जिम आणि मॉल्स सुरु केले जाऊ शकतात. सध्या यासाठीच्या मार्गदर्शक सूचीवर आरोग्य विभाग काम करत असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.

पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबतही यावेळी राजेश टोपे यांनी भाष्य केले. आता पुण्यातही मुंबईप्रमाणे मिशन झिरो राबवण्यात येणार आहे. पंधरा मिनिटात रिपोर्ट मिळतील, अशा टेस्ट घेण्यात आल्या आहेत. त्याचे किट सर्व खासगी रुग्णालयांनी आपल्याकडे ठेवावेत. कोणत्याही रुग्णाला परत पाठवून दिल्याची तक्रार समोर आल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्याचा इशाराही राजेश टोपे यांनी दिला.