‘या’ राज्य सरकारचा पालकांना दिलासा; जोपर्यंत शाळा नाही, तोपर्यंत कोणतीही फी नाही


अहमदाबाद : देशावर ओढावलेले कोरोनाचे दुष्ट संकट अद्यापही कायम आहे. त्यातच देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात होणारी हजारोंची वाढ चिंतेचा विषय बनत आहे. तसेच या कोरोनामुळे देशातील सर्वच शाळा बंद आहेत. अशा संकटकाळात गुजरात सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठा निर्णय घेत विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेची फी भरण्यासंदर्भात मोठा दिलासा दिला आहे.

यासंदर्भात अधिसूचना जारी करुन पालकांना गुजरात सरकारने दिलासा दिला आहे. गुजरात सरकारच्या अधिसूचनेनुसार शाळा सुरू होईपर्यंत पालकांकडून कोणत्याही प्रकारची फी शाळा घेऊ शकत नाहीत. तसेच फीसाठी विद्यार्थी किंवा पालकांवर शाळांकडून दबाव आणल्यास त्यांच्यावर जिल्हा शिक्षणधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, विद्यार्थ्यांची शालेय फी ज्या पालकांनी जमा केली आहे, त्यांची शाळा उघडल्यानंतर फी परत द्यावी किंवा पुढील महिन्यात त्यांचा विचार केला जावा. पण, राज्यातील खासगी शाळांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. गुजरातच्या खासगी स्कूल बोर्डाने आत्तापासून ऑनलाईन क्लास घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे सध्या शाळा बंद आहेत. अशा परिस्थितीत शाळा सुरू न करताही अनेक शाळा पालकांकडून फी आकारत होत्या. याप्रकरणी जनहित याचिका दाखल केली होती. जनहित याचिकेनंतर गुजरात उच्च न्यायालयाला गुजरात सरकारने आदेश दिल्यानंतर गुजरात सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.