क्वारंटाईन असताना केस कापणे व्यक्तीला पडले महागात, लागला लाखोंचा दंड

जगभरातील देशांमध्ये कोरोना व्हायरस महामारीमुळे क्वारंटाईनचे नियम कठोर करण्यात आले आहेत. नियम मोडणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागत आहे. ब्रिटनमध्ये एका व्यक्तीला सेल्फ आयसोलेशनमध्ये असताना केस कापणे चांगलेच महागात पडले आहे. यामुळे या व्यक्तीला तब्बल 7,600 डॉलरचा (जवळपास 5.67 लाख रुपये) दंड भरावा लागला आहे.  या व्यक्तीला दोन आठवडे सेल्फ आयसोलेशनमध्ये राहायचे होते. या दरम्यान त्याला बाहेर पडण्यास आणि लोकांना भेटण्यास मनाई होती.

मात्र ग्रेथ ले मॉनिअर नावाच्या या 37 वर्षीय व्यक्तीने नियमाचे उल्लंघन केले. व्यक्तीला 14 दिवस क्वारंटाईन राहायचे होते. परंतु, हा कालावधी संपायच्या आधीच केस कापण्यासाठी तो सलूनमध्ये पोहचला. याशिवाय व्यक्ती खेळण्याच्या दुकानात आणि कॅफेमध्ये देखील गेला होता.

बॉर्डर एजेंसीचे अधिकारी तपासणीसाठी त्याच्या घरी गेल्यावर व्यक्ती घरी नव्हता. यानंतर अधिकाऱ्यांनी व्यक्तीच्या पत्नीला फोन केल्यावर हे जोडपे घरी परतले व ग्रेथला अटक करण्यात आले.

हे प्रकरण न्यायालयात गेले. तेथे त्याला प्रत्येक गुन्ह्यासाठी 3,800 डॉलर्स असा एकूण 7600 डॉलर्स दंड ठोठावण्यात आला व दंडाची रक्कम पुर्ण भरल्यानंतरच सोडण्यात येईल असा आदेश दिला.