ए. आर. रहमान यांनी अनोख्या पद्धतीने वाहिली सुशांतला श्रद्धांजली


प्रसिद्ध संगीतकार आणि गायक ए आर रहमान यांनी ‘दिल बेचारा’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतला गाण्यातून श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ‘दिल बेचारा’ या चित्रपटाच्या म्यूझिक ट्रॅकचा त्यासाठी वापर केला असून हा व्हिडीओ यूट्यूब रिलीज करण्यात आला आहे.

बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय गायक या १३ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून सहभागी झाल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ए आर रहमान, श्रेया घोशाल, सुनिधी चौहान, अमिताभ भट्टाचार्या, मोहित चौहान, हृदय गट्टानी आणि जोनिता गांधी यांनी सहभाग घेतला आहे. चित्रपटातील तारे गिने, खुलके जिने का, फ्रेंडझोन आणि मसखरी हे गाणे त्यांनी गायले आहे. तसेच सुशांतच्या काही खास आठवणी या व्हिडीओमध्ये शेअर करण्यात आल्या आहेत.

सुशांत मुकेश छाब्रा दिग्दर्शित ‘दिल बेचारा’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. तसेच अभिनेत्री संजना सांघी ही सुशांतसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच अभिनेता सैफ अली खानदेखील या चित्रपटात पाहूण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. जुलै २०१८मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. तसेच हा चित्रपट जॉन ग्रीक यांच्या ‘द फॉल्ट इन आवर स्टार्स’ या पुस्तकावर आधारित असल्याचे म्हटले जाते. डिझ्नी प्लस हॉटस्टारवर २४ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.