देशात मागील २४ तासात ३७ हजार ७२४ नव्या रुग्णांची नोंद


नवी दिल्ली – देशात काल दिवसभरात ३७ हजार ७२४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १२ लाखांच्या जवळ पोहोचला आहे. देशात सध्या कोरोनाचे ११ लाख ९२ हजार रुग्ण आहेत. यामध्ये ६ लाख ५३ हजार ५० जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आले असून ४ लाख ११ हजार १३३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सोबतच गेल्या २४ तासात ६४८ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २८ हजार ७३२ एवढी झाली आहे.

१ कोटी ४७ लाख कोरोना चाचण्या देशात २१ जुलैपर्यंत करण्यात आल्या असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) देण्यात आली आहे. यामध्ये मंगळवारी करण्यात आलेल्या ३ लाख ४३ हजार २४३ चाचण्यांचाही समावेश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत सर्वात जास्त चाचण्या करण्यात आलेल्या असून भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे.

देशभरात जलद प्रतिद्रव नमुना चाचण्यांची संख्या वाढली असल्यानेही प्रतिदिन रुग्णांची संख्या वाढताना दिसते. मात्र, कोरोनाबाधितांचे प्रमाण ५ टक्क्यांवर आणण्याचे प्रमुख लक्ष्य असल्याचे मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. देशातील २३ एप्रिल ते २१ जुल या काळातील कोरोनाबाधितांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण ८.०७ टक्के आहे. एकूण नमुना चाचण्यांपैकी कोरोनाबाधित नमुन्यांचे प्रमाण म्हणजे कोरोनाबाधित होण्याचा दर. मंगळवारी हे प्रमाण ११.१४ टक्के होते. गेल्या आठवडय़ात हे प्रमाण १० टक्के होते. दोन आणि चार आठवडय़ांपूर्वी ते अनुक्रमे ९.७ टक्के व ८ टक्के होते. ३० राज्यांमध्ये कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.