३१ जुलै नाहीतर ३१ डिसेंबरपर्यंत IT कर्मचाऱ्यांना करावे लागणार Work From Home


नवी दिल्ली – मंगळवारी रात्री केंद्र सरकारकडून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची वर्क फ्रॉम होमची मर्यादा ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा करण्यात आली असून आता माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी आणि बीपीओ कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना या घोषणेनुसार ३१ डिसेंबर २०२० पर्यंत घरुनच काम करता येणार आहे. ३१ जुलै रोजी वर्क फ्रॉम होमची मर्यादा संपत होती. पण ही मुदत त्याआधीच पाच महिन्यांनी वाढवली आहे. दूरसंचार विभागाने मंगळवारी रात्री यासंदर्भातील माहिती ट्विटवरुन दिली आहे.

दूरसंचार विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरुन काम करण्यासंदर्भातील अटी आणि नियमांमध्ये ३१ डिसेंबर २०२० पर्यंत शिथिल करण्यात आल्याचे दूरसंचार विभागाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. सध्या आयटी क्षेत्रातील ८५ टक्के कर्मचारी घरुनच काम करत आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेसंदर्भातील कर्मचारी कार्यालयांमध्ये जाऊन काम करत आहेत. दूरसंचार विभागाने यापूर्वीही ३० एप्रिल रोजी वर्क फ्रॉम होमसंदर्भातील मुदत संपण्याआधीच ती ३१ जुलैपर्यंत वाढवली होती. राज्यातील माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांबरोबर केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि संवाद मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदरम्यान ही घोषणा केली होती.

१३ मार्च रोजी सर्वात आधी सरकारने आयटी कंपन्यांनी घरुन काम कऱण्याची परवानगी देण्यासंदर्भात सूचना जारी केल्या होत्या. आधी हा कालावधी ३० एप्रिल आणि त्यानंतर ३१ जुलै रोजी संपणार होता. पण तो आता थेट ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. म्हणजेच हा वर्क फ्रॉम होमचा कालावधी आता एकूण ९ महिन्यांचा झाला आहे. भारतामधील आयटी क्षेत्रातील प्रमुख केंद्र असणाऱ्या बंगळुरु, हैदराबाद, मुंबई, दिल्ली एनसीआर, पुणे यासारख्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रभाव अधिक असल्याने या सवलतींचा कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

Loading RSS Feed