लाच न दिल्यामुळे सहा वर्षाच्या मुलावर आईसह स्ट्रेचर ढकलण्याची वेळ


लखनऊ : सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशमधील एका रुग्णालयातील सहा वर्षाचा लहान मुलगा आईसह स्ट्रेचर ढकलत असल्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजणांनी रुग्णालय प्रशासनावर आपला रोष व्यक्त केला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील आहे.

लहान मुलगा आणि त्याची आई आजोबांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात आले आहेत. यावेळी आजोबांवर उपचार करण्यासाठी त्यांना एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करत आहे. यावेळी आई आणि मुलगा स्वत: स्ट्रेचर ढकलत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

स्ट्रेचर ढकलण्यासाठी रुग्णालयातील वॉर्ड बॉयने रुग्णाच्या नातेवाईकांकडे तीस रुपयांची मागणी केली होती. पण त्याला पैसे देण्यास नातेवाईकांनी नकार दिल्यामुळे त्यांच्यावर स्वत: स्ट्रेचर ढकलण्याची वेळ आली. तुर्तास या वॉर्ड बॉयला कामावरुन काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हा व्हिडीओ जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच त्यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्यासोबत त्यांनी रुग्ण छेंदी यादव आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयाच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एक संयुक्त चौकशी समिती स्थापन केली आणि तातडीने या प्रकरणाचा अहवाल मला द्या, अशा सूचना त्यांनी दिल्या.

गौरा गावचे छेंदी हे रहिवाशी आहेत. त्यांच्या पायाला दोन दिवसांपूर्वी जखम झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. या दरम्यान त्यांच्यासोबत त्यांची मुलगी बिंदू आणि सहा वर्षाचा नातू असल्याचे रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

छेंदी यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यास सांगितले होते. पण या कामासाठी वॉर्ड बॉयने पैसे मागितले. मी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे वॉर्ड बॉयने स्ट्रेचर ढकलण्यास नकार दिला. त्यामुळे मला आणि माझ्या मुलाला स्ट्रेचर ढकलावा लागला, असे मुलगी बिंदूने सांगितले.

बिंदूला माहित नव्हते ती स्ट्रेचर खेचताना कुणीतरी त्यांचा व्हिडीओ काढत आहे. व्हिडीओ काढल्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. दरम्यान रुग्णालयाच्या मुख्य चिकित्सा अधिकाऱ्यांनी वॉर्ड बॉयला कामावरुन काढून टाकले आणि या प्रकरणाची अधिक चौकशी सुरु केली आहे आणि त्याचबरोबर यापुढे पुन्हा असे होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, अशी ग्वाही रुग्णालयाच्या अधिकाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे.