इराणचे स्पष्टीकरण; भारताला चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळल्याची निव्वळ अफवा


नवी दिल्ली – भारतला चाबहार रेल्वे प्रकल्पातून इराणने वगळल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपूर्वी सगळ्याच माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याचबरोबर त्यावेळी इराण आणि चीनमधील 400 अब्ज डॉलरच्या कराराचा हा परिणाम असल्याचीही चर्चा होती. पण असे काही झालेले नसल्याचे सांगत इराणने ते वृत्त फेटाळून लावले आहे.

यासंदर्भात एक निवेदन इराणकडून जारी करण्यात आले आहे असून, त्यात चाबहार जहांदान रेल्वे प्रकल्पाचा भारत आजही भाग असल्याचे म्हटले आहे. भारताला चाबहार रेल्वे प्रकल्पातून वगळण्यात आल्याच्या मीडियाच्या वृत्ताचे इराणने खंडन केले. या वृत्तांचा निषेध करत या अहवालामागे कारस्थान असल्याचे इराणच्या परिवहन आणि रेल्वे विभागाचे उपमंत्री सईद रसौली यांनी सांगितले. हा रेल्वे प्रकल्प चाबहार बंदर ते जहांदानदरम्यान बांधला जाणार आहे.

इराणचे परिवहन व नगरविकास मंत्री मोहम्मद इस्लामी यांनी गेल्या आठवड्यात 628 किलोमीटर लांबीच्या रेल्वे ट्रॅकच्या कामाचे उद्घाटन केले. हा रेल्वे मार्ग अफगाणिस्तानच्या झारंज सीमेपर्यंत वाढविण्यात येणार आहे. द हिंदूच्या अहवालानुसार हा प्रकल्प मार्च २०२२पर्यंत पूर्ण होणार आहे.

चाबहार करारावर 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इराण दौर्‍यादरम्यान स्वाक्षरी झाली होती. संपूर्ण प्रकल्पात सुमारे 1.6 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार होती. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इरकॉनचे अभियंतेदेखील इराण येथे गेले, परंतु अमेरिकेच्या निर्बंधामुळे भारताने रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू केलेले नव्हते. अमेरिकेने चाबहार बंदरासाठी सवलती दिल्या आहेत, पण उपकरण आणि पुरवठादार अद्यापही उपलब्ध नाहीत.