एसटी महामंडळातील 28 हजार कर्मचाऱ्यांची होणार स्वेच्छा निवृत्ती ?


मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात स्वेच्छा निवृत्तीचा (Voluntary retirement) प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो लवकरच राज्य सरकारकडे देण्यात येणार आहे. तब्बल 28 हजार कर्मचाऱ्यांची एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे नोकरी जाण्याची शक्यता आहे. दरम्यान महामंडळात होणारी स्वेच्छा निवृती बीएसएनएल नंतरची सर्वात मोठी असणार आहे.

50 वर्ष वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाकडून स्वेच्छा निवृत्ती दिली जाईल. महामंडळात काम करणाऱ्या 28 हजार कर्मचाऱ्यांचे वय 50 वर्षापेक्षा अधिक आहे. तसेच या निर्णयामुळे दरमहा 100 कोटी रुपयांच्या पगाराची महामंडळाची बचत होणार आहे. चौदाशे कोटी रुपयांचा खर्च स्वेच्छा निवृत्तीसाठी येणार आहे. महामंडळ याबाबत राज्य सरकारकडे मागणी करणार आहे. राज्य सरकारने निधी दिला तरच हा निर्णय होऊ शकणार आहे. एसटी महामंडळ क्षमतेपेक्षा अधिक कर्मचारी झाल्याने ही योजना आणण्याचा विचार करत आहे. राज्यात एक बस मागे 6:15 कर्मचारी आहेत. देशाच्या 14 राज्याच्या परिवहन मंडळात हे प्रमाण एक बस मागे पाच कर्मचारी आहे.


एसटी महामंडळाचे कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मोठे नुकसान झाल्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाच हजार कोटी रुपये एसटीचा पूर्वीचा तोटा आहे. त्यात लॉकडाऊनमुळे दोन हजार दोनशे कोटींची भर पडली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महामंडळाने सरकारकडे 480 कोटी रुपये मागितले आहेत.