चाकरमान्यांना गणपती बाप्पा पावला; गणेशोत्सवानिमित्त कोकणात एसटीने जाण्यास सशर्त परवानगी

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी गोड बातमी दिली आहे. एसटीने नियमांचे पालन करुन चाकरमान्यांना आता गणेशोत्सवासाठी कोकणात जाता येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

गणेशोत्सवानिमित्त कोकणातील आपल्या गावी जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना अटी आणि शर्तीसह एसटीने प्रवास करणे शक्य असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. एसटीची सेवा उपलब्ध होणार असल्यामुळे लोकांना एसटी उपलब्ध करून द्याव्या लागतील. पण हे सर्व अटी शर्थींची पूर्तता करुन करावे लागेल. गणेशोत्सव काळात कोकणात गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

कोकणात मुंबई आणि पुणे या भागातून चाकरमान्यांना जाता यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणारी यंत्रणा सक्षम केली जात आहे. आयसीएमआर, आरोग्य विभागाकडून आम्ही गाईडलाईन्स मागवल्या आहेत. राज्य सरकार त्याविषयी अधिक माहिती घेत असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

यंदा चाकरमान्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणात प्रवेश दिला जाणार का, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी या पार्श्वभूमीवर कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही बंदी नसल्याचे स्पष्टीकरण आधीच दिले होते. चाकरमानी आणि गणेशोत्सव हे एक समीकरण आहे. कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही बंदी नाही. तसेच जिल्हा प्रशासनाचे वृत्त हा अंतिम निर्णय नसल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली. पण चाकरमानी कोकणात ज्या ठिकाणाहून येणार आहेत, त्याच ठिकाणी त्यांची कोविड चाचणी माफक दरात करावी, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे विनायक राऊत म्हणाले होते. तर दुसरीकडे भाजप खासदार नारायण राणे यांनी गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु, असा इशारा दिला आहे.