महाविकास आघाडीतील घटक पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज – चंद्रकांत पाटील


कोल्हापूर: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना टोला लगावत राज्यातील सरकार आता कोसळले या भीतीने घटकांना झोप येत नसेल्यामुळे त्यांना आता झोपेच्या घेण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर तुम्ही सरकार चालवा, आम्ही ते पाडण्यासाठी प्रयत्न करणार नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

सध्या राजकीय वर्तुळात मध्यप्रदेश, राजस्थान नंतर भाजपने मिशन महाराष्ट्र हाती घेतल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतीच दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली, पण भेटीनंतर फडणवीस यांनी त्यांची ही भेट राजकीय नसल्याचे म्हटले होते.

दरम्यान कोरोनाच्या या संकट काळात सर्वसामान्य लोकांचे जगणे कठीण झाले. महागाई वेगाने वाढत आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील वाढले आहेत. यापूर्वी काँग्रेसने पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरून केंद्र सरकार विरोधात आंदोलन केले होते. दरम्यान, मित्रपक्षांना घेऊन आता भाजप दूध दरवाढीसाठी आंदोलन करणार आहे. हे आंदोलन 1 ऑगस्टला करण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, डेअरीना प्रतिलिटर दहा रुपये देण्याची आमची मागणी आहे. आमचे आंदोलन हिंसक नसेल, अधिकाऱ्यांना दूध भेट देणे आणि परवानगी मिळाली तर देवाला दूध अर्पण करणे, असे या आंदोलनाचे स्वरूप असेल.