भाजप खासदाराचा सल्ला; गोमूत्र प्या आणि कोरोनापासून बचाव करा


कोलकाता – सध्या सोशल मीडियावर ‘कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या’ हे पश्चिम बंगालमधील भाजप खासदार आणि प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांचे वक्तव्य चांगले व्हायरल होत आहे. घोष यांनी गोमूत्राची माहिती देताना लोकांना कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला आहे. गोमूत्र पिल्याने शरीराची कोरोनाच्या विषाणूसोबत लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे दिलीप घोष यांचे म्हणणे आहे.

सध्या सोशल मीडियावर दिलीप घोष यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. खासदार घोष व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका बैठकीत असून ते तेथे घरगुती गोष्टींचा आरोग्यासाठी वापर समजावून सांगत आहे. हे सांगताना त्यांनी गोमूत्र पिल्याने लोकांचे आरोग्य सुधारते तसेच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते, असा दावाही त्यांनी या दरम्यान केला आहे.

या व्हिडीओत ५५ वर्षीय घोष म्हणतात की, जर गायीबद्दल मी बोलायला लागलो तर अनेकजणांना ते पटणार नाही आणि ते असहज होतील. गाढवे कधीही गायीची महती समजू शकणार नाहीत. हा भारत आहे. ही भगवान श्रीकृष्णाची धरती आहे. येथे आपण गायीची पूजा करतो. आपल्याला आरोग्य सुधारण्यासाठी गोमूत्र पिणे आवश्यक आहे. जे दारू पितात त्यांना गायीचे महत्त्व कसे काय लक्षात येईल. दरम्यान घोष यांची असे वक्तव्य करण्याची पहिलीच वेळ नाही. ते याआधी देखील अशी वक्तव्य करून चर्चेत आले होते. गाईच्या दुधात सोने असते, असे त्यांनी म्हटल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोलही झाले होते.