UGC चे अधिकारी स्वतःच्या मुलांचा जीव धोक्यात घालून परीक्षेला पाठवतील का?, रोहित पवार


मुंबई – देशावर ओढावलेल्या कोरोना संकटाचा सामना संपूर्ण देश एकजुटीने करत असतानाच या संकट काळात महाराष्ट्र, दिल्ली, ओडिशा यासारख्या राज्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास ठाम नकार दिला आहे. तरी देखील विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) परीक्षा घेण्याच्या आपल्या हट्टावर कायम आहे. राज्य सरकारेही विद्यापीठांना परीक्षा न घेताच पदव्या देण्यास कायद्यानुसार सांगू शकत नाहीत, असे आयोगाचे म्हणणे आहे. याच दरम्यान यूजीसीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.

रोहित पवार यांनी परीक्षेसंदर्भात थेट यूजीसीच्या अधिकाऱ्यांनाच सवाल केला आहे. स्वतः कोरोनाला घाबरुन सुरक्षितपणे ऑनलाईन मिटींग घेणाऱ्या #UGC च्या अधिकाऱ्यांनी परीक्षेचा आग्रह धरून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नये. परिक्षेबाबत प्रचंड मानसिक तणावात असलेले राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक विद्यार्थी त्यांच्या तीव्र भावना रोज आम्हा लोकप्रतिनिधींकडे व्यक्त करतात. आपण कोरोनाच्या आजच्या परिस्थितीत स्वतःच्या मुलाला तरी त्याचा जीव धोक्यात घालून परीक्षेतला पाठवू का? हा प्रश्न यूजीसीच्या अधिकाऱ्यांनी स्वतःला विचारावा तसेच विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता ‘परीक्षा’ या विषयाचा एकदाचा ‘निकाल’ लावावा, अशा आशयाचे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.