पोलिसांसाठी सोनू सुदने दिले 25,000 फेस शिल्ड; गृहमंत्र्यांनी मानले आभार


मुंबई – कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊन दरम्यान अभिनेता सोनू सूदने मुंबईसह राज्यात अडकून पडलेल्या लाखाहून अधिक स्थलांतरित मजूरांची त्यांच्या घरी सुखरुप वापसी करुन दिली होती. त्याच्या या कार्याची सर्वच स्तरातून प्रशंसा झाली. पण आता त्याने जनतेची सेवा करण्यात तत्पर असलेल्या महाराष्ट्र पोलिसांना 25,000 फेस शिल्ड भेट म्हणून दिले आहेत. त्याची ही मोलाची मदत पाहून ट्विटरच्या माध्यमातून त्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आभार मानले आहेत.

अनिल देशमुख यांची सोनू सूदने भेट घेतली आणि पोलिस कर्मचा-यांसाठी 25,000 फेस शिल्ड दिले. मी सोनू सूद याचा या अतुलनीय योगदानाबद्दल आभारी आहे असे आशयाचे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे. सोनू सूद च्या या कामाबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून टीका केली होती. पण ‘अग्रलेख लिहीण्या पलिकडे काय केले? असा थेट सवाल करत मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विटच्या माध्यमातून राऊतांवर निशाणा साधला होता.

मंत्री जयंत पाटील यांनीही अभिनेता सोन सूद याच्या या कामगिरीचे कौतुक केले होते. तर क्रिकेटर शिखर धवन याने देखील सोनूच्या या कार्याला ट्विटच्या माध्यमातून सलाम केला होता. या व्यतिरिक्त सोनू सूदने कोरोना व्हायरसच्या संकटात विविध माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. पीपीई कीट पुरवण्यापासून आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी त्याने हॉटेल खुले करुन दिले होते.