पाकिस्तानने तिसऱ्यांदा दिली कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी


इस्लामाबाद – भारताकडून पाकिस्तानात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यासाठीची मागणी करण्यात आल्यानंतर भारताची मागणी मान्य करत पाकिस्तानने भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना भेटीची परवानगी दिली होती. काल झालेल्या भेटीनंतर पाकिस्तानने आता तिसऱ्यांदा भेटीसाठी परवानगी दिली आहे.

गुरूवारी कुलभूषण जाधव यांची इस्लामाबादेतील भारतीय उच्चायुक्तालयातील दोन राजनैतिक अधिकाऱ्यांनी भेट घेतली होती. भारताने केलेल्या मागणीनंतर पाकिस्तानने भेटीची परवानगी दिली होती. पण, कुलभूषण जाधव आणि भारतीय राजनैतिक अधिकारी यांच्या भेटीची व्यवस्था पाकिस्तानने ठरल्याप्रमाणे केली नसल्यामुळे या भेटीत मुक्त संवाद साधता आला नाही, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते.

भारताकडून सातत्याने राजनैतिक अधिकारी व कुलभूषण जाधव यांच्यात कुठल्याही अडथळ्यांशिवाय व विनाअट चर्चा व्हावी अशी विनंती केली जात आहे. त्यानंतर तिसऱ्यांदा कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी पाकिस्तानने दिली असल्याची माहिती पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दिली. सुरक्षा कर्मचारी भेटीवेळी न ठेवण्याची भारताची मागणी असून, त्यासंदर्भात तोंडी सूचना देण्यात आल्याचे कुरेशी यांनी सांगितले.