अल्पवयीन होता एन्काउंटरमध्ये मारला गेलेला विकास दुबेचा सहकारी, कुटुंबाचा दावा

कानपूर हत्याकांडातील आरोपी विकास दुबेला पोलिसांनी एन्काउंटरमध्ये मारले होते. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याच्या सहकार्यांना देखील एन्काउंटरमध्ये ठार केले होते. यामध्ये प्रभात मिश्रा हा देखील होता. मात्र आता एन्काउंटरमध्ये मारला गेलेला प्रभात मिश्रा अल्पवयीन असल्याचा दावा त्याच्या कुटुंबाने केला आहे. या संदर्भात आज तकने वृत्त दिले आहे.

कुटुंबाचे म्हणणे आहे की, त्याने 29 जूनलाच उत्तर प्रदेश बोर्डातून 12वी ची परीक्षा पास केली होती आणि 10 दिवसांनंतर त्याला एन्काउंटरमध्ये मारण्यात आले. प्रभात मिश्राच्या 10वीची गुणपत्रिका आणि आधार कार्डवर त्याची जन्मतारीख 27 मे 2004 दाखवण्यात आली आहे. प्रभात मिश्राचे कुटुंब बिकरू गावात विकास दुबेच्या घराच्या बाजूला राहते.

कानपूरचे आयजी मोहित अग्रवाल म्हणाले की, प्रभातच्या वयाची आम्हाला माहिती नव्हती. हरियाणा पोलिसांनी पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करण्यासाठी वापरलेली पिस्तूल जप्त केली होती व प्रशांतला 8 जुलैला अटक केले होते. तेव्हा त्याच्याकडे ही पिस्तूल सापडली होती. तेव्हा फरीदाबाद पोलिसांनी सांगितले होते की, प्रभात मिश्रा 19 वर्षांचा असून, विकास दुबे आपल्या गँगमध्ये युवकांनाच भरती करतो. उत्तर प्रदेश पोलिसांनुसार, 9 जुलैला प्रभातला फरीदाबादवरून कानपूरला आणताना त्याने सब इंस्पेक्टरची बंदूल हिसकावून घेतली व पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. या दरम्यान चकमकीत तो मारला गेला.

प्रभातची आई म्हणाल्या की, या घटनेनंतर तो पळून गेला होता. यात त्याचा काहीही संबंध नव्हता. तो अल्पवयीन होता व त्याने 17 वर्ष देखील पुर्ण केले नव्हते. त्याला जर पकडले होते, तर त्याला दुसरी काही शिक्षा द्यायला हवी होती.