ठाकरे सरकारची केंद्राला ‘मोहम्मद द मेसेंजर ऑफ गॉड’वर बंदी आणण्याची विनंती


मुंबई – ‘मोहम्मद द मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रसारण बंदीसाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्र शासनाला पत्र लिहिले असून राज्याच्या सायबर विभागाकडे रझा अकादमी या संस्थेने तक्रार अर्ज केल्यानंतर यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदीनुसार त्यांनी केंद्राला पत्राद्वारे बंदीची विनंती केली आहे. २१ जुलै रोजी हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. पण त्यावर बंदी घालावी, असे विनंतीपत्र रझा अकादमीने राज्याच्या सायबर विभागास पाठविले होते.

याबद्दलची माहिती अनिल देशमुख यांनी ट्विट करत दिली. महाराष्ट्र शासनाला समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारा तसेच एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावणारा ‘मोहम्मद द मेसेंजर ऑफ गॉड’ हा चित्रपट सोशल मीडिया/ओटीटी प्लॅटफॉर्मवरून बॅन करण्याच्या रझा अकादमीने केलेल्या तक्रारीनुसार गृहमंत्री या नात्याने मी केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयास माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० नुसार सदर चित्रपट सोशल मीडिया/ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज होऊ न देण्याची पत्राद्वारे विनंती केल्याचे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

तसेच हा चित्रपट युट्यूब, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अॅप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सला प्रसारित न करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता हे बंदी घालण्यासाठीचे विनंतीपत्र दिले असल्याची देशमुख यांनी दिली.