लॉकडाऊनच्या काळात गरजुंची मदत करणाऱ्या योद्ध्याचा कोरोनामुळे दुर्दैवी अंत


नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश मागील तीन महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये आहे. पण तरी देखील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत आहे. पण या लॉकडाऊनच्या काळात अनेक स्वयंसेवी संस्था व काही कोरोना योद्ध्यांनी या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. लॉकडाऊनच्या काळात उपासमार होत असलेल्यांच्या पोटाची खळगी भरण्याचे काम कोरोनाचा धोका असतानाही जीवापेक्षा माणुसकी मोठा म्हणत या कोरोना योद्ध्यांनी केले. ते दिवस-रात्र गरजूंची मदत करीत होते.

अशातच एक दुःखद बातमी समोर आली आहे. मागील तीन महिन्यांपासून दिल्लीतील नागरी संरक्षण स्वयंसेवक अरुण सिंह गरजुंना मदत करीत होते. पण त्यांच्यावरच कोरोनाने काळाचा घाला घातला आणि त्यांचा या जीवघेण्या रोगामुळे दुर्दैवी अंत झाला. अरुण सिंह यांचे 13 जुलै रोजी निधन झाले. ते 48 वर्षांचे होते.

अरुण सिंह यांची महिन्याच्या सुरुवातीला कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर 4 जुलै रोजी त्यांना द्वारका विभागातील वेंकटेश्वर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण मृत्यूशी झुंज देत असताना त्यांचा मृत्यू झाला. दिल्लीतील कोविड रिस्पॉन्स सिस्टमचा आधार असलेल्या हजारो स्वयंसैनिकांपैकी ते एक होते.


हजारो गरजुंना अन्न-धान्यासह आवश्यक वस्तू अरुण सिंह पुरवित होते. कामादरम्यान ते व्यवस्थित काळजी घेत होते. पण एवढे करुनही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांचा मुलगी नववीत आहे तर मुलीने बारावी बोर्डाची परीक्षा दिली होती. मुलीचा सोमवारी निकाल आला मात्र वडिलांच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन त्यांच्या कार्याला सलाम केला आहे.

Leave a Comment