मंत्र्यांच्या मुलाला झापणाऱ्या महिला कॉन्स्टेबलचा राजीनामा!


सुरत – सध्या सर्वच माध्यमांच्या मथळ्यांमध्ये सुरतमधील महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनीता यादव यांचीच चर्चा होत आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या गुजरातचे आरोग्यमंत्री कुमार कनानी याच्या मुलाला अडवल्यानंतर झालेल्या वादाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मंत्र्याच्या मुलाला आपले कर्तव्य बजावताना रोखणाऱ्या सुनीता यांचे सोशल मीडियावर कौतुकही झाले होते. त्यानंतर आता सुरत पोलीस या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

गेल्या आठवड्यात बुधवारी (8 जुलै) हा सगळा प्रकार घडला होता. सुरतमधील वरछा भागातील मार्केटमध्ये कुमार कनानींचा मुलगा प्रकाश कनानींचा मित्र बुधवारी रात्री गेला होता. त्याने मास्क घातला नसल्यामुळे कॉन्स्टेबल सुनीता यादव यांनी त्याला अडवले. त्यानंतर त्याने फोन करून प्रकाश कनानींना घटनास्थळी बोलवून घेतल्याचे वृत्त आहे. सुनीता यादव यांना 365 दिवस तिथेच उभे करून ठेवेन, अशी धमकी प्रकाश यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर सुनीता यादव यांनीही प्रकाश आणि त्यांच्या मित्राची कठोर शब्दात कानउघडणी केली.

सध्या सोशल मीडियावर प्रकाश कनानींसोबतच्या या वादाची ऑडिओ आणि व्हीडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली. आम्ही तुमचे गुलाम नसल्याचे सुनीता प्रकाश कनानींना सुनावताना दिसत आहेत. हे सगळे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचल्यानंतर सुनीता यादव यांनी राजीनामा दिला. अर्थात, पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार सुनीता यांची बदली ही पोलीस मुख्यालयात करण्यात आली आहे.


प्रकाश कनानी आणि त्याच्या दोन मित्रांना रविवारी (12 जुलै) अटक करण्यात आली. नंतर त्यांना जामीनही मिळाला. तर सुनीता यादव या आजारपणाच्या रजेवर गेल्या असल्याचे अहमदाबाद मिररने आपल्या वृत्तात म्हटले आहे. सुनीता यादव यांनी आपल्या मुलाला शिवीगाळ केल्याचे कुमार कनानींनी म्हटल्याचे अहमदाबाद मिररने आपल्या वृत्तात म्हटले बातमीत आहे. त्याचबरोबर सुनीता यादव यांच्याशी त्या रात्री फोनवर बोलताना मी कायदेशीर कारवाई करा, असे म्हटले. पण त्यांना शिवीगाळ करण्याची गरज काहीच नसल्याचे अहमदाबाद मिररशी बोलताना कुमार कनानींनी सांगितले.

सुनीता यांची क्लिप रविवारी (12 जुलै) व्हायरल झाली आणि सोशल मीडियावर सुनिता यांचे लोक समर्थन करायला लागले. सुनीता या क्लिपमध्ये प्रकाश कनानींना कारवरची MLA ची पाटी काढायला सांगत आहेत. पोलीस म्हणून ड्युटीवर असताना आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही अडवू शकतो, असेही त्या म्हणत आहेत. यानंतर ट्विटरवर #SunitaYadav #ISupportSunitaYadav हे हॅशटॅग ट्रेंड व्हायला लागले. मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी कुमार कनानींचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही जोर धरू लागली. त्याचबरोबर सुनीता यांना सोशल मीडियावर ‘लेडी सिंघम’ म्हणूनही संबोधले जाऊ लागले आहे.

Leave a Comment