शरद पवारांचा खळबळजनक आरोप; सूडाचे राजकारण करतात पंतप्रधान


मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. दरम्यान आज या मुलाखतीचा तिसरा भाग प्रदर्शित झाला असून यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खळबळजनक आरोप केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सूडाचे राजकारण करत आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडून सत्तेचा सरळसरळ गैरवापर होत असल्याचे म्हटले आहे. शरद पवार यांना याच मुलाखतीत संजय राऊत यांनी प्रश्न विचारला की ममता बॅनर्जी असतील किंवा ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही त्या राज्यांचे प्रमुख नेते असतील ते कायम असा आरोप करतात की नरेंद्र मोदींकडून सूडाचे आणि फोडाफोडीचे राजकारण केले जाते, त्याचे मध्यप्रदेश हे ताजे उदाहरण आहे. शरद पवार यांनी या प्रश्नावर सविस्तर उत्तर दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सूडाचे राजकारण करत असून त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचे सरळसरळ दिसत आहे. मनमोहन सिंग हे ज्यावेळी देशाचे पंतप्रधान होते तेव्हा मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. तसेच काही राज्यांची सत्ता भाजपकडे होती. पण त्यावेळी पंतप्रधान असलेले मनमोहन सिंग यांनी कधीही सूडबुद्धीचे धोरण भाजपशासित राज्यांच्या बाबतीत स्वीकारले नाही. त्या काळात सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ज्यावेळी पंतप्रधानांसोबत बैठक होत असे त्यावेळी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दोन दिवस आधी होत असे. त्या बैठकीत नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानांबाबत अत्यंत कठोर शब्दात टीका करायचे. याआधी एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री एवढ्या कठोर शब्दांत पंतप्रधानांवर टीका करतो, हे आम्ही पाहिले नव्हते.

मी मनमोहन सरकारमध्ये कृषीमंत्री होतो. त्यावेळी गुजरातलाही काही वेळा जाणे झाले. ज्यानंतर काँग्रेसमधील काही मंत्र्यांनी माझ्यावर टीका केली, ते म्हणू लागले की मोदी मनमोहन सिंग यांच्यावर एवढी टीका करत आहेत तर भारताचे कृषीमंत्री गुजरातचा दौरा का करतात? त्यावेळी पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंग यांनी सांगितले की गुजरातही आपल्या देशाचा भाग आहे. आपण सगळ्या देशाची हिताची जपणूक करण्यासाठी बसलेलो असल्यामुळे शरद पवार जे करत आहेत ते योग्य आहे. हे धोरण कुठे आणि आजचे धोरण कुठे? आज याच्या उलट परिस्थिती आहे. भाजपची सत्ता ज्या राज्यात नाही तिथे फोडाफोडी करा, याचे सरकार पाड, त्याचे सरकार पाड. काहीतरी प्रयोग राजस्थानमध्येही सुरु केल्यामुळे मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या दोघांच्या धोरणात कमालीचा फरक जाणवतो, असेही शरद पवारांनी म्हटले आहे. आता भाजपकडून शरद पवार यांनी केलेल्या या टीकेला काय आणि कशाप्रकारे दिले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment