व्यवस्थित आम्ही काळजी घेतली तर पुढच्या निवडणुका सुद्धा एकत्र लढवू


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडी सरकारला स्थापन होऊन सहा महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लोटला आहे. सरकारच्या अस्थिरतेच्या चर्चांचे पेव या काळात अधूनमधून फुटले होते. त्याचबरोबर इतरही राज्यात सत्तांतर झाली. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी या राजकीय पार्श्वभूमीवर शरद पवार यांना राज्यातील सरकारच्या भवितव्याविषयी प्रश्न उपस्थित केला. त्याला पवार यांनी उत्तर दिले.

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीचा अखेरचा भाग आज प्रसिद्ध झाला. राजकीय विषयांवर या भागात शरद पवार यांनी प्रामुख्याने भाष्य केले. संजय राऊत यांनी ठाकरे सरकारचे भविष्य काय?, असा प्रश्न विचारला. त्यावर पाच वर्षे हे सरकार चालेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि अशी व्यवस्थित आम्ही काळजी घेतली तर पुढच्या निवडणुका सुद्धा एकत्र लढवू, असे सुतोवाच शरद पवार यांनी यावेळी बोलताना दिले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांना टोला आणि सल्ला देताना शरद पवार म्हणाले, विरोधी पक्षाचे म्हणजे एकतर विधान परिषदेतील विरोधी पक्षाची संपूर्ण टीम आहे. आपल्यासंबंधीच्या जबाबदारीचा ती इमॅक्ट करायला फार यशस्वीरित्या मला दिसत नाही असे विधानसभेचे चित्र आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देखील सगळीकडे फिरताहेत. प्रश्न समजून घेण्याचा करत आहेत. हे विरोधी पक्षाचे काम आहे, बोलणे, टीका टिप्पणी करणे. सत्ताधारी पक्षाची धोरणे कुठे चुकत असतील, तर त्याच्याबद्दल त्यांना बोलायचा अधिकार आहे आणि तो लोकशाही ज्यांना मान्य आहे, त्यांनी मान्यच केला पाहिजे. पण, त्याच्यामध्ये आकस असल्याचे दिसता कामा नये.

आज काय या ठिकाणी दिसत आहे की, एकेकाळचे मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष आणि विरोधी पक्षात असलेले लोक हे एकत्रित काम करणारे होते. आज एकत्रितपणे काम करण्याची भूमिका त्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाने घेतलेली नसल्यामुळे आपल्या हातातील सत्ता गेली. याचे वैषम्य आणि अस्वस्थता ही विरोधी पक्षनेत्यांची अजिबात गेलेली दिसत नाही.

सत्ता येते आणि जाते. पण, लोकांनी दिलेली जबाबदारी समर्थपणाने पार पाडायची असते. ज्यावेळेला सत्ता गेल्याच्या नंतर मी सुद्धा मुख्यमंत्री होतो. माझे मुख्यमंत्रिपद ८० साली गेल्यानंतर मी विरोधी पक्षाचा नेता झालो. पण व्यक्तिगत माझा अनुभव असा आहे, विरोधी पक्षाचा नेता म्हणून काम करण्यात मला अधिक गंमत येत होती. त्याचे एक समाधान होते. पण आज असे काय दिसत आहे की, विरोधी पक्षनेता असे म्हणत असेल की, मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्रीपद माझे गेले. ते स्वीकारायला मला वेळ लागला. म्हणजे मी सत्तेशिवाय चालू शकत नाही. जे प्रश्न लोक विचारतात, त्याला आम्ही सांगू शकत नाही.

असेच अप्रत्यक्षपणे व्यक्त करण्यासारखे आहे म्हणून मला स्वतःला असे वाटत की, विरोधी पक्षाच्या नेत्याने आपण स्वतः सत्ता हा आपला रस्ता नाही. आपण कधीकाळी होतो, आज त्याचा यदा कदाचितही विचार करायचे कारण नाही. आज आपण विरोधी पक्षाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी लोकांनी आपल्यावर दिलेली आहे, ती आपण समर्थपणाने पार पाडली पाहिजे. ती पार पाडण्यासाठी पडेल ते कष्ट केले पाहिजे. त्यासाठी सत्ता माझ्याकडे नाही, मला डायजेस्ट करता येत नाही, विसरता येत नाही. ही भूमिका घेणे चांगले नसल्याचा चिमटा काढत पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला.

Loading RSS Feed

Leave a Comment