संचारबंदीमध्ये फिरताना आरोग्यमंत्र्यांच्या मुलाला हटकले म्हणून महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बदलीची कारवाई


सूरत – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशपातळीवर लॉकडाऊनसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे, पण अशा संकटकाळात आपल्या मित्रांसोबत फिरणाऱ्या गुजरात सरकारमधील आरोग्यमंत्र्यांच्या मुलावर कारवाई केल्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्याची बदली करण्यात आल्याचा प्रकार सूरतमध्ये समोर आला आहे. आता या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला आहे. राजकीय दबाबाखाली पोलीस काम करत असल्याची टीका होऊ लागली असून याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

संचारबंदीच्या काळात राज्य आरोग्यमंत्री आणि आमदार कुमार कनानी यांचा मुलगा प्रकाश कनानी आणि त्याच्या मित्रांनी कॉन्स्टेबल सुनीता यादव यांच्यासोबत रोखल्यामुळे वाद घालण्यास सुरुवात केली. रविवारी सोशल मीडियावर घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता यादव यांनी प्रकाश याच्या मित्रांना लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याने रोखल्यानंतर प्रकाश याला फोन करुन त्यांनी बोलावून घेतले. प्रकाश आपली कार घेऊन घटनास्थळी पोहोचला होता. यानंतर त्याने सुनीता यादव यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वर्षभर याच ठिकाणी मी तुला उभे राहण्यास भाग पाडू शकतो, अशी धमकीही त्याने यावेळी दिली. सोशल मीडियावर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होऊ लागला होता.

सुनीता यादव यांनीही यावेळी आपण तुमची गुलाम नसल्याचे उत्तर दिले. हा वाद समोर आल्यानंतर पोलीस मुख्यालयात सुनीता यादव यांची बदली करण्यात आली आहे. प्रकाश आणि त्याच्या मित्रांना रविवारी अटक करण्यात आली होती. पण नंतर त्यांनी जामिनावर सोडण्यात आले. याप्रकरणी सुरतच्या पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान घटनेनंतर सुनीता यादव सुट्टीवर गेल्या असून त्यांनी यावर अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही.

Leave a Comment