जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानींची सातव्या स्थानी झेप


संपूर्ण जगात कोरोना या जीवघेण्या व्हायरसने हाहाकार माजवला असल्यामुळे जगभरातील अनेक देशांची अर्थव्यवस्था अक्षरशः खिळखिळीत झाली असून कोरोनामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनचा मोठमोठ्या उद्योगधंद्यांवर यामुळे मोठा परिणाम झालेला असताना दुसरीकडे भारतातील मोठे उद्योजक मुकेश अंबानी यांच्यासाठी २०२० हे वर्ष खूपच चांगले ठरले आहे.

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये या काळात अनेक कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केल्यामुळे रिलायन्स जिओच्या व्यवसायातही वाढ झाली आहे. त्याचमुळे या वर्षी मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही जबरदस्त वाढ झाल्यामुळे जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत ते सातव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. तसेच प्रसिद्ध उद्योगजक वॉरेन बफेट यांनाही त्यांनी मागे टाकले आहे. यासंदर्भातील आकडेवारी ब्लूमबर्गने जाहीर केली असून याबाबतचे वृत्त फोर्ब्स इंडियाने दिले आहे.

सुमारे ७० अब्ज डॉलरपर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती पोहोचल्यामुळे आता जगातील १० सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानी यांचा समावेश झाला असून प्रसिद्ध उद्योगपती वॉरेन बफेट यांनाही त्यांनी मागे टाकले आहे. बफेट यांची एकूण संपत्ती ६७.९ अब्ज डॉलर आहे. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, गुरुवारी मुकेश अंबानी यांनी एकूण संपत्तीच्या बाबतीत वॉरेन बफेट यांनाही मागे टाकले. मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढ दिसून आली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रिजचे शेअर्स या वर्षी मार्चपासून आत्तापर्यंत जवळपास दुप्पट झाले आहेत. १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक रिलायन्सच्या डिजिटल उद्योगात आल्याने त्यांच्या कंपनीमध्ये शेअरमध्ये वाढ झालेली दिसून आली. रिलायन्समध्ये फेसबुक, सिल्वर लेक सारख्या कंपन्यांनी १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. तर बीपीपीएलसी या कंपनीने या आठवड्यात १ अब्ज डॉलरची गुंतवणूक रिलायन्सच्या इंधन व्यवसायात केल्यामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये जबरदस्त वाढ दिसून आली आहे.

मुकेश अंबानी आशियाचे शक्तीशाली भांडवलदार बनले असून त्यांचा जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील पहिल्या दहामध्ये समावेश झाला आहे. ते यामध्ये एकमेव आशियाई उद्योजक आहेत. या महिन्यात वॉरेन बफेट यांनी २.९ अब्ज डॉलरचे दान केल्यामुळे त्यांच्या संपत्तीत घट झालेली पहायला मिळाली. मुकेश अंबानी यांनी सातव्या स्थानी झेप घेतली असून त्यांनी वॉरेन बफेट आणि गुगलचे लॅरी पेज यांना मागे टाकले आहे.

Leave a Comment