ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या आईसह कुटुंबातील तीन जण कोरोनाबाधित


बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अभिनेते अनुपम खेर यांच्या आईसह कुटुंबातील तीन जण कोरोनाबाधित असल्याची माहिती ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत अनुपम खेर यांनी स्वतः दिली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे अनुपम खेर यांची आई दुलारी यांना असून त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अनुपम खेर यांचे भाऊ राजू खेर, वहिनी व भाची यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या तिघांमध्येही कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचे त्यांनी सांगितले. अनुपम खेर यांनी स्वत: देखील कोरोना चाचणी केली असून त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

यासंदर्भातील माहिती देताना अनुपम खेर यांनी ट्विटरवरील व्हिडीओत माझ्या आईला गेल्या काही दिवसांपासून भूक लागत नव्हती, ती काहीच खात नव्हती, दिवसभर झोपून राहत होती. म्हणून आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्या रक्ताची चाचणी केली. रक्ताचा रिपोर्ट नॉर्मल होता. त्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला त्यांचा सिटीस्कॅन करायला सांगितला. सिटीस्कॅनमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर मी आणि माझ्या भावाने लगेचच सिटीस्कॅन केला. त्यात माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि भावाचा पॉझिटिव्ह आला.

त्यानंतर माझ्या भावाच्या कुटुंबीयांचीही चाचणी करण्यात आली. त्यात वहिनी आणि भाचीलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. कोकिलाबेन रुग्णालयात आईला दाखल करण्यात आले असून माझ्या भावाला आणि त्याच्या कुटुंबीयांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. याबद्दलची माहिती मी मुंबई महानगरपालिकेला दिली असून ते उत्तमरित्या त्यांचे काम करत आहेत. मी तुम्हालासुद्धा सांगू इच्छितो की घरात जर कोणाला भूक लागत नसेल तर त्यांची कोरोना चाचणी करून घ्या. कारण मी फार वेळ विचार करत होतो की भूक का लागत नाही. डॉक्टरसुद्धा त्यांचे काम खूप चांगल्या पद्धतीने करत असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment