राज भवनातील १८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण - Majha Paper

राज भवनातील १८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण


मुंबई – राज्यावर आणि विशेषतः मुंबईवर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अजूनच गडद होत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात काल दिवसभरात आतापर्यंतच्या उच्चांकी रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यात वाढ होत असतानाच राज भवनातील जवळपास १८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या कर्मचाऱ्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्यानंतर आलेल्या रिपोर्टमध्ये ते कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. राज्यपालांचे कार्यालय व निवासस्थान असलेल्या राजभवनातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी १८ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने चाचणी करण्यात आली आहे.

दरम्यान राज्य सरकारच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील सर्व व्यवहार पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न होत असताना कोरोनाचा प्रसार आणि रुग्णसंख्या वेगाने वाढताना दिसत आहे. राज्यात शनिवारी आतापर्यंतची दिवसभरातील सर्वात मोठ्या रुग्णसंख्या वाढीची नोंद झाली. मागील २४ तासांमध्ये महाराष्ट्रात ८ हजार १३९ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २२३ मृत्यू मागील चोवीस तासांमध्ये नोंदवले गेले आहेत. या संख्येमुळे महाराष्ट्रातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १० हजार ११६ एवढी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये ४ हजार ३६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यातल कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २ लाख ४६ हजार ६०० एवढी झाली आहे. यापैकी १ लाख ३६ हजार ९८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला ९९ हजार २०२ अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Comment