म्हैसूर पाक खाल्ल्याने कोरोना बरा होतो, अशी जाहिरात करणाऱ्या दुकानाचा परवाना रद्द


तामिळनाडू – भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) अन्न संरक्षण आणि सुरक्षा काद्याअंतर्गत कलम ५३ आणि कलम ६१ नुसार कोईम्बतूर येथील मिठाई दुकानदारावर आमच्या दुकानातील म्हैसूर पाक खाल्यास कोरोना बरा होतो, असा दावा केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

कोईम्बतूर येथील कारवाई करण्यात आलेल्या मिठाईच्या दुकानाचे नाव श्री राम नेल्लाई लाला स्वीट्स असे आहे. आपल्या दुकानातील म्हैसूर पाक हा कोरोना बरा करु शकतो अशा माहितीची पत्रक दुकानाचे मालक श्रीराम यांनी वाटली होती. श्रीराम हे या औषधी म्हैसूर पाकचा फॉर्म्युला पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोफतमध्ये सांगण्यास तयार असल्याचेही या पत्रकांमध्ये म्हटले होते. यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिले आहे.

कोरोनाची लागण झालेल्यांना हा औषधी म्हैसूर पाक सुरुवातील थोडा कडू लागेल, पण त्यानंतर त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढल्यानंतर तो गोड लागतो, असाही दावा या पत्रकात करण्यात आला होता. हा फॉर्म्युला आम्ही सरकारला मोफत देण्यास तयार असून हा फॉर्म्युला आम्ही मोदींना देऊ, त्याचबरोबर आम्ही केंद्राने स्थापन केलेल्या एखाद्या समितीबरोबर वर्षभरासाठी मोफत काम करण्यास तयार असल्याचे श्रीराम यांनी म्हटले आहे.

दरम्यान ही जाहिरात व्हायरल झाल्यानंतर एफएसएसएआयच्या नजरेत आली. त्यानंतर श्रीराम यांच्या दुकानाला एफएसएसएआयचे कोईम्बतूरमधील आरोग्य सेवेचे सह निर्देशक आणि सिद्धा जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी भेट दिली. या भेटीसंदर्भातील कल्पना जिल्हाधिकाऱ्यांना आधीच देण्यात आली होती. श्रीराम यांचा खाद्य विक्री परवाना चौकशी आणि तपासानंतर रद्द करण्यात आला आहे. त्यांच्या दुकानाला एफएसएसएआयने सील केले आहे. त्याचबरोबर एक लाख रुपये किंमतीचा १२० किलो म्हैसूर पाक अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे.

Leave a Comment