आशिया खंडातील सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन


नवी दिल्ली : व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत मध्य प्रदेशातील रीवामध्ये स्थापन करण्यात आलेल्या 750 मेगाव्हॅटचा सौरऊर्जा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला समर्पित केला. या कार्यक्रमासाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्रीही उपस्थित होते. हा प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प असून त्याची क्षमता 750 मेगाव्हॅट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील रीवा येथील सौरऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी देशाला संबोधित केले. मोदी त्यावेळी म्हणाले की, रीवाने आज इतिहास रचला आहे. आम्ही आकाशातून टिपलेल्या या प्लांटचा जेव्हा व्हिडीओ पाहतो, त्यावेळी असे वाटते की, हजारो सोलार पॅनल शेतातील पिंकाप्रमाणे डोलत आहेत. रीवाचा सौरऊर्जा प्रकल्प या संपूर्ण क्षेत्राला ऊर्जेचे केंद्र बनणार असल्यामुळे मध्यप्रदेशातील लोकांना लाभ मिळणार असून दिल्ली मेट्रोलाही वीज मिळणार आहे.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, रीवामधील नागरिक आता गर्वाने सांगितील की, आमचा रीवा दिल्लीतील मेट्रो चालवत आहे. याचा फायदा मध्यप्रदेशातील गरीब, मध्यम वर्गीय, शेतकरी आणि आदिवासी लोकांना होणार आहे. त्याचबरोबर आई नर्मदेमुळे आणि पांढऱ्या वाघांमुळे रीवाची ओळख आहे. आता आशिया खंडातील सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाशी रीवाचे नाव जोडले जाणार आहे. रीवाचा हा सोलार प्लांट या संपूर्ण क्षेत्राला या दशकातील सर्वात मोठे ऊर्जेचे केंद्र बनवण्यासाठी मदत करणार आहे. या प्रकल्पामुळे मध्यप्रदेशमधील उद्योगधद्यांसोबतच दिल्लीतील मेट्रोलाही फायदा होणार आहे.

Leave a Comment