यापुढे राज्यात रेमडेसिवीर औषधासाठी रुग्णांना आधारकार्ड दाखविणे बंधनकारक


मुंबई – मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तांना कोरोनाच्या उपचारांसाठी तयार करण्यात आलेल्या रेमडेसिवीर औषधासाठी आधारकार्ड सक्तीचे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापूर्वी केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने (सीडीएससीओ) राज्यांच्या औषध प्रशासनाला परिपत्रकाद्वारे कोरोनावरील उपचारातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले होते.

गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिवीर औषधाचा फार मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याच्या बातम्या प्रसारीत होत होत्या. या पार्श्वभूमीवर अस्लम शेख माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले की, यापुढे रेमडेसिवीर औषधासाठी रुग्णांना आधारकार्ड दाखविणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. रेमडेसिवीर औषधाचा डोस ज्या रुग्णांना देण्यात आला आहे, त्या रुग्णांची नोंद त्यांच्या आधारकार्डसह ठेवणेही रुग्णालयांना बंधनकारक असेल, असेही शेख यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने (सीडीएससीओ)राज्यांच्या औषध प्रशासनाला परिपत्रकाद्वारे कोरोनावरील उपचारात महत्वपूर्ण असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले होते. याचा तुटवडा देशभरात असल्यामुळे या औषधाची ज्यादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले होते. काही कंपन्यांना या इंजेक्शनच्या आयातीसाठी परवानगी दिली होती. तसेच भारतातील तीन कंपन्यांना निर्मितीची परवानगीही दिलेली आहे. पण तरीही देशभरातील अनेक ठिकाणी ज्यादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी येत होत्या.

Leave a Comment