महाराष्ट्रात नव्याने गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना नोकरभरतीसाठी ‘महाजॉब्स’ बंधनकारक


मुंबई – राज्यातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्याचबरोबर उद्योजकांनाही कुशल आणि अकुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत महाजॉब्स या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली असून उद्योगक्षेत्रात रोजगार मिळवण्यासाठी उत्सुक उमेदवारांनी व नोकरी देणाऱ्या कंपन्यांनी महाजॉब्स संकेतस्थळाला दिलेला महाप्रतिसाद उत्साहवर्धक आहे.

नुकतेच विविध देशांतील कंपन्यांसोबत राज्य सरकारने सामंजस्य करार केले आहेत. या कंपन्यांमध्ये नोकरभरती करताना महाजॉब्समध्ये नोंदणी करणे बंधनकारक असेल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर केले. आतापर्यंत महाजॉब्सच्या माध्यमातून ७५० जणांना भरती प्रक्रियेसाठी बोलावणेही आले आहे. दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने सुरू केलेल्या महाजॉब्स संकेतस्थळाला राज्यातील नोकरी इच्छुक तरुणांनी महाप्रतिसाद दर्शविल्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे.

एमआयडीसीला यावर संनियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. नोंदणी करणाऱ्या इच्छुकांना नोकरी मिळेपर्यंत पाठपुरावा केला जाईल. सध्या कार्यरत असलेल्या कंपन्यांमध्ये उपलब्ध रोजगार या संकेतस्थळावरून मिळतील. पण त्याचबरोबर महाराष्ट्रात नव्याने गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना आपल्या नोकरभरती प्रक्रियेत महाजॉब्सचा वापर करणे बंधनकारक असेल. नुकतेच काही सामंजस्य करार राज्य सरकारने केले. त्यांनाही नोकरभरतीसाठी महाजॉब्सचा वापर करावा लागेल. त्यामुळे भूमिपुत्रांना रोजगार मिळण्यासाठी या संकेतस्थळाचा चांगला उपयोग होईल, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. दरम्यान एक लाख २६ हजार ९६१ वर महाजॉब्सवर रोजगारासाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्या पोहोचली असून १०४२ कंपन्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १८ कंपन्यांनी बुधवारी १२०६ पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली.

Leave a Comment