भारतीय लष्कराचे अधिकारी, जवानांना ‘हे’ ८९ अ‍ॅप्स मोबाइलमधून काढून टाकण्याचे आदेश


नवी दिल्ली – भारतीय लष्कराने चीनसोबत वाढता तणाव तसेच गोपनीय माहितीच्या सुरक्षेवरुन प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने मोबाइलमधून ८९ अ‍ॅप्स जवानांना तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. यासंबंधीचा आदेश भारतीय लष्कराकडून जारी करण्यात आला असून टीक-टॉक, फेसबुक, इन्स्टाग्राम तसंच पबजीचाही यामध्ये समावेश आहे.

राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी संवेदनशील आणि गोपनीय माहिती भारतीय लष्करातील अधिकारी आणि जवानांच्या फोनमधून चोरी होण्याची शक्यता असल्याने हा आदेश देण्यात आला आहे. टिंडरसारखे अ‍ॅपदेखील डिलीट करण्यास लष्कराने सांगितले आहे. याशिवाय काऊचसर्फिंग आणि बातम्यांसाठी वापरले जाणारे डेलीहंट हे अ‍ॅपही डिलीट करण्यास सांगण्यात आले आहे.


भारतीय लष्कराने अधिकारी, जवानांना ही अ‍ॅप्स १५ जुलैपर्यंत काढून टाकावीत असे निर्देश दिले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून, आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा लष्कराने दिला आहे. याआधी भारत सरकारने टीक-टॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदीचा निर्णय जाहीर केला होता.

दरम्यान सोशल मीडिया वापरण्यासाठी भारतीय लष्कराने मुभा दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅप, टेलीग्राम, सिग्नल, युट्यूब, ट्विटर यांचा वापर करण्यासाठी अधिकारी आणि जवानांना परवानगी आहे. पण या ठिकाणी आपल्या लष्करामधील सेवेसंबधी माहिती उघड करु नये ही अट घालण्यात आली आहे.

Leave a Comment