डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान असलेल्या राजगृहाच्या बागेची अज्ञातांकडून नासधूस


मुंबई : मंगळवारी (7 जुलै) दोन अज्ञातांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर नासधूस केली आहे, त्याचबरोबर या अज्ञातांनी राजगृहाच्या खिडकीच्या काचाही फोडल्या तसेच घरातील कुंड्यांचीही नासधूस केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचेही या घटनेत नुकसान झालं आहे. माटुंगा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह हे निवासस्थान आहे. त्यांचे हे निवासस्थान मुंबईच्या दादरमधील हिंदू कॉलनी परिसरात आहे. हे घर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी बांधले होते. या ठिकाणी बाबासाहेबांचे जगभरातील अनुयायी भेट देण्यासाठी येतात.

दरम्यान सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. यासंदर्भात ट्विटरवर आंबेडकर यांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे. ते म्हणाले की, व्हिडीओद्वारे मी सगळ्यांना आवाहन करतो आहे की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे. ही गोष्ट खरी आहे की राजगृहावर दोघेजण आले, त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर गोष्टी तोडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने लक्ष घातले. पोलिसांनी त्यांचे काम चोख केले. जनतेने शांतता राखावी आणि राजगृहाच्या आजूबाजूला जमू नये, अशी विनंती मी करतो.

त्याचबरोबर दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. गृहमंत्र्यांनी याबाबत ट्विट केले आहे की, आज जो काही अज्ञात व्यक्तींनी दादर येथील ‘राजगृह’ या डॉ.आंबेडकरांच्या निवासस्थानावर हल्ला केला तो निषेधार्थ आहे. पोलिसांचा याबाबत तत्परतेने तपास सुरु असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल.

मुंबईतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक महत्वाच्या ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचे दुष्कृत्य आहे. घटनेची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपासकार्य सुरु केले आहे. लवकरात लवकर आरोपींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या कुहेतूला नागरिकांनी बळी पडू नये, शांतता, संयम पाळावा, एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. महामानव डॉ. बाबासाहेबांचे कार्य आणि विचार समाजमनात खोलवर रुजले आहेत, आपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहे, त्या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

राजगृह हे डॉ. बाबासाहेबांचे निवासस्थान आहे. बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. हे आम्हा आंबेडकर अनुयायांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत असून गृहमंत्र्यांना विनंती आहे की, सखोल चौकशी होऊन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान ‘राजगृह’ ही आमची अस्मिता आहे. माथेफिरुंनी केलेली तोडफोड हा आमच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला आहे. मी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी लक्ष घालून या माथेफिरुंना अटक करुन कठोर कारवाई करावी !जय भीम!, असे धनंजय मुंडे म्हणाले.

दादर, मुंबई येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असणाऱ्या ‘राजगृह’ येथे काही अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली. या पवित्र वास्तुची ही अशी तोडफोड होणे हे अतिशय संतापजनक आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्ती व मानसिकतेचा तीव्र निषेध, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरजी यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेल्या राजगृह यावर अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली. मी सदर घटनेचा निषेध करतो. राजगृह हे सर्वांचे प्रेरणास्थान आहे. अशा प्रेरणास्थानाची तोडफोड करणार्‍याला तात्काळ अटक करावी व कडक कारवाई करावी.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानावर दगडफेक करणाऱ्यांना शोधून तात्काळ शासनाने कार्यवाही केली पाहिजे. या घटनेचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो. आजही महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकर या महापुरुषांच्या संस्कारांनी चालतो. महापुरुषांच्या नावाची विटंबना रोखणारा नवीन कायदा शासनाने त्वरित तयार करून अंमलबजावणी करावी. त्यामुळे असे समाज विघातक कृत्ये थांबतील, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

Leave a Comment