ईडीने जप्त केली नीरव मोदीची लंडन, यूएईमधील फ्लॅटसह ३३० कोटीची संपत्ती


नवी दिल्ली – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटींचा चुना लावून फरार झालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीची ३३० कोटीची संपत्ती जप्त केली आहे. मुंबई, लंडन आणि संयुक्त अरब अमिरातीमधील आलिशान फ्लॅटचा यामध्ये समावेश आहे. ही कारवाई फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यातंर्गत करण्यात आली आहे. नीरव मोदीची २,३४८ कोटींची संपत्ती ईडीने यापूर्वी जप्त केली आहे.

मुंबईच्या वरळी भागातील समुद्र महाल येथील फ्लॅट, अलिबागमधील समुद्र किनाऱ्यावरील फार्म हाऊस, राजस्थान जैसलमेरमधील मॉल, लंडन-यूएईमधील फ्लॅटस ताज्या कारवाईमध्ये जप्त करण्यात आले आहेत. मुंबईतील विशेष न्यायालयाने आठ जूनला ईडीला संपत्ती जप्त करण्याची परवानगी दिली होती. याच कोर्टाने मागच्यावर्षी पाच डिसेंबरला नीरव मोदीला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले होते.

नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीशी संबंधित कंपन्यांमधील तब्बल २ हजार ३०० किलोपेक्षा अधिक सोने मागच्या महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाने भारतात आणले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्याची किंमत १ हजार ३५० कोटी रूपयांच्या जवळपास आहे. यामध्ये पॉलिश्ड डायमंड, पर्ल आणि सिल्व्हर ज्वेलरीचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हाँगकाँगमधील एका लॉजिस्टिक कंपनीच्या गोदामात हे सर्व ठेवण्यात आले होते. मुंबईमध्ये आलेल्या १०८ कंसायमेंट्सपैकी ३२ हे नीरव मोदीद्वारे चालवण्यात येणाऱ्या कंपन्यांचे आहेत. तर उर्वरित हे मेहुल चोक्सीच्या कंपनीचे आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता पीएमएलए अंतर्गत हे कंसायमेंट्स अधिकृतरित्या जप्त करण्यात येणार आहे. तसेच हाँगकाँगमधील सर्व कायदेशीर प्रक्रियाही ईडीने पूर्ण केल्यानंतर ही ज्वेलरी भारतात आणण्यात आली आहे.

Leave a Comment