बेजबाबदारपणे वागणाऱ्या ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांना कोरोनाची लागण


ब्रासिलिया : जगावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्याप कमी झालेले नाही. त्यातच या रोगाने अनेक बड्या नेत्यांना आपल्या विळख्यात घेतले आहे. त्याच यादीत आता ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांचा देखील समावेश झाला आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांना कोरोनाची लागण झाली असून बोल्सोनारो यांनी स्वतः आपल्यात कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत असून अद्याप मला कोणताही त्रास होत नसून मी बरा असल्याचे म्हटले आहे. ब्राझीलमधील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. कोरोनाबाधित देशांच्या यादीत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे.

जवळपास 16 लाखांहून अधिक ब्राझीलमधील लोक कोरोनाबाधित आहेत. यापैकी जवळपास 66 हजार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनासंदर्भातील खबरदारीच्या उपाययोजना जेअर बोल्सोनारो यांच्या सरकारने न केल्याचा आरोप होत आहे.


दरम्यान सध्या सोशल मीडियावर बोल्सोनारो यांचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यांच्यावर टीकाही होत आहे. ब्राझिलियाच्या अल्वोरदा पॅलेसमध्ये मीडियासमोर आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर करताना अध्यक्षांनी चक्क मास्क काढला. त्यांनी हे जाहीर केल्यानंतर पुन्हा मास्क लावला. सध्या खबरदारी म्हणून मास्क वापरणे बंधनकारक आहे. त्यात जर एखादा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्याने मास्क लावणे अनिवार्य आहे. पण एखाद्या देशाचे अध्यक्ष असलेले बोल्सोनारो अशा प्रकारे बेजबाबदारपणे वागल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.

बोल्सोनारो यांनी कोरोनाचा संसर्ग होत असताना सुरुवातीच्या काळात, कोरोना व्हायरस सामान्य फ्लू असल्याचे म्हटले होते. कोरोनाची मला लागण झाली तरी या सामान्य फ्लूसमोर मी हार मानणार नाही. कोरोना व्हायरसप्रमाणे अनेक फ्लू आहेत, ज्यामुळे अधिक लोकांना मृत्यू होतो, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले होते. कोरोनासारख्या महामारीला कमी लेखणे ब्राझीलला चांगलेच महागात पडत आहे.

Leave a Comment