भाजपने दुर्लक्ष केलेल्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादीच्या नेत्याकडून मदत


मुंबई – १९९० साली देशभरात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली तेव्हा डोंबिवलीत वास्तव्यास असणारे भाजपचे कार्यकर्ते सलीम मखानी त्याचे सारथ्य करत होते. सध्या शास्त्रीनगर रुग्णालयातील व्हरांडय़ात खुर्चीत बसून उपचार घेण्याची वेळ याच सलीम मखानी यांच्यावर आली आहे. विशेष एवढी वाईट वेळ आली असतानाही त्यांना भाजपकडून कोणत्याही मदतीचा हात मिळाला नाही. पण त्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी धाव घेतली. जितेंद्र आव्हाड यांनी सलीम मखानी यांना तातडीने दोन महागडी इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यामुळे आता त्यांची प्रकृती सामान्य आहे

सलीम मखानी हे देशात गाजलेल्या रामजन्मभूमी आंदोलनात अग्रेसर राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेवेळी त्यांच्या वाहनाचे चालक होते. त्यांची एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. अडवाणींचे हे जुने चालक मागील तीन दिवसांपासून आजारी आहेत. श्वसनाचा त्रास त्यांना होऊ लागल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील खासगी, पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी धावाधाव केली. पण कोठेही खाट मिळत नसल्यामुळे अखेर महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात भाजपच्या या जुन्याजाणत्या कारसेवकाला आणण्यात आले. तिथेही खाट उपलब्ध नसल्याने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील व्हराडय़ांत सकाळपासून एका खुर्चीत बसून ऑक्सिजन पुरवठय़ावर ठेवण्यात आले होते.

कृत्रिम श्वसनयंत्रणेची दोन यंत्रे शास्त्रीनगर रुग्णालयात आहेत, तीही उपलब्ध नसल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले. मखानी हे दाऊद बोहरा समाजातील आहेत. भायखळा येथे मदिना सर्वोपचारी रुग्णालय या समाजाचे आहे. अखेर त्यांच्या प्रमुखाशी चर्चा करण्यात आली. मदतीची तयारी त्यांनी दाखविली. भायखळा येथून शनिवारी रात्री उशिरा कार्डिअ‍ॅक रुग्णवाहिका येऊन सलीम मखीना यांना उपचारासाठी घेऊन गेली.

शास्त्रीनगर रुग्णालयाने सलीम मखीना यांना संशयित कोरोना रुग्ण म्हणून जाहीर केले. त्यांच्या फुप्फुसांना जंतुसंसर्ग झाला आहे. प्रकृती गंभीर होत असल्याने अखेर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी सलीम यांच्या नातेवाईकांनी संपर्क केला. जितेंद्र आव्हाड यांनी तातडीने दोन महागडी इंजेक्शन सलीम यांना उपलब्ध करून दिली. त्यांची प्रकृती आता सामान्य आहे.

Leave a Comment