सोशल मीडियात ट्रेंड होत आहे दिल बेचारामधील मनाला भिडणारा सुशांतचा संवाद


नुकताच दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा अखेरचा चित्रपट असलेल्या दिल बेचाराचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून सध्या सोशल मीडियावर त्याचीच जोरदार चर्चा होत आहे. सुशांतने जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा त्याच्या दमदार अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उठवली आहे. त्याचबरोबर या ट्रेलरमध्ये सुशांतच्या तोंडी असलेला एक संवाद देखील गाजत आहे.

ट्रेलरमध्ये सुशांत “जनम कब लेना है, मरना कब है ये हम डिसाइड नहीं कर सकते. पर कैसे जिना है ये हम डिसाइड कर सकते है”, असा संवाद बोलताना दिसत आहे. मुंबईतील आपल्या राहत्या घरी १४ जून रोजी सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येची घटना प्रत्येकाच्याच मनाला चटका लावून गेल्यामुळे सुशांतच्या तोंडी चित्रपटात असलेला हा संवाद प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे.

सुशांतसोबत या चित्रपटात नवोदित अभिनेत्री संजना सांघीची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश छाब्राने केले असून त्याचा देखील हा पहिलाच चित्रपट आहे. तर चित्रपटाला ए. आर. रेहमान यांनी संगीत दिले आहे. सुशांतचा हा चित्रपट येत्या २४ जुलै रोजी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Leave a Comment