सीबीएसई-फेसबुकमध्ये सामंजस्य करार; डिजिटायझेशनसह एआर तंत्रज्ञानाचे धडे


नवी दिल्ली : सोशल मीडियात जगतातील अग्रगण्य कंपनी फेसबुकने केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डासोबत (सीबीएसई) सामंजस्य करार केला असून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना याच्या माध्यमातून डिजिटायझेशनसह एआर (Augmented Reality) तंत्रज्ञानाचे धडे दिले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करत दिली आहे.

विद्यार्थी आणि शिक्षकांना डिजिटल सुरक्षा, ऑनलाईन कार्य आणि ऑग्मेंटेड रिअॅलिटीचे प्रशिक्षण देण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डोने फेसबुकसोबत करार केला आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना ऑनलाईनसंदर्भात येणाऱ्या समस्यांबाबत माहिती घेता यावी तसेच प्रशिक्षण घेता यावे यासाठी हा कार्यक्रम सीबीएसईने राबवला आहे.


शिक्षणक्षेत्रात कोरोनामुळे तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. अशा शिक्षणपद्धतीवर भविष्यात अधिकाधिक जोर दिला जाऊ शकतो. त्यामुळे याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. याबाबत केंद्रीय मंत्री निशंक यांनी ट्विट करत म्हटले आहे की, सीबीएसई आणि फेसबुकच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षा, ऑनलाईन सुरक्षा आणि ऑग्मेंटेड रियलिटीसंबंधी प्रमाणित कार्यक्रम सुरु करण्यासाठी हा करार झाला आहे.

या प्रशिक्षणासाठी 6 जुलैपासून 20 जुलैपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरु राहणार आहे. 10 ऑगस्टपासून शिक्षकांचा प्रशिक्षण कार्यक्रम तर 6 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु होणार आहे. सीबीएसई आणि फेसबुककडून या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊन कोर्स पूर्ण करणाऱ्यांना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. फेसबुक या कराराअंतर्गत सीबीएसईला आर्टिफिशयल रिअॅलिटी सुरु करण्यासाठी मदत करणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 हजार शिक्षकांना तर दुसऱ्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

शिक्षकांनी येथे, तर विद्यार्थ्यांनी येथे नोंदणी करावी

Leave a Comment