मराठा आरक्षण: वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर संतापले संभाजीराजे


कोल्हापूर – सध्या सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा मुद्दा असून त्यावर सुनावणीही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस मंत्र्याच्या वक्तव्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे. विजय वडेट्टीवार यांनी मी ओबीसी असल्यामुळेच मराठा क्रांती मोर्चा माझा विरोध करत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर संभाजीराजे यांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.


ते म्हणाले, मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला न्याय देत एकत्र आणले, त्यांच्या नावाने अस्तित्वात आलेल्या या संस्थेला आणि त्या आडून मराठा समाजाला अश्या पद्धतीने बदनाम करणे योग्य होणार नाही. शिव-शाहू- फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील जबाबदार नेत्यांना हे वर्तन शोभणारे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सुनावणी होणार असल्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


दरम्यान संभाजीराजे यांनी रविवारी फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मराठा समाजाने सरकारवर विश्वास ठेवला आहे. पण मराठा आरक्षणाला नख लावल्यास समाज कधीच खपवून घेणार नाही, असा खणखणीत इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. मराठा समाजाने हे आरक्षण संघर्ष आणि त्यागातून मिळवले असल्यामुळे त्यासाठी नेटाने प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

खासदार संभाजीराजे म्हणाले, 7 तारखेला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण संदर्भात सुनावणी होणार आहे. त्यासंदर्भात न्यायालयात बाजू मांडणाऱ्या वरिष्ठ वकिलांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे पूर्वतयारीची बैठक पार पडली. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मला फोन करून याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर त्यांना मी आश्वस्त केले, की आपण एवढ्या गांभीर्याने सर्व गोष्टी आता करत आहात तर मराठा समाज सुद्धा आपल्यावर विश्वास ठेवून सहकार्य करेल. पुराव्यावर आधारित न्यायालय न्याय देते. त्यामुळे सर्व बाबी चोख असाव्यात अश्या सूचना त्यांना केल्या.

Leave a Comment