भूमिपुत्रांसाठी ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; नोकरीसाठी डोमिसाइल बंधनकारक


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यातील भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी एमआयडीसीच्या महाजॉब्स संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले आहे. ऑनलाइन पद्धतीने या संकेतस्थळाचे उद्धव ठाकरे यांनी उद्घाटन केले. उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यावेळी उपस्थित होते. यावेळी राज्यात नोकरीसाठी डोमिसाइल बंधनकारक असणार असल्याची घोषणा सुभाष देसाई यांनी केल्यामुळे आता महाजॉबवर नोंदणीसाठी डोमिसाइल आवश्यक असणार आहे.

डोमिसाइल बंधनकारक असल्यामुळे भूमिपुत्रांना आपोआप संधी मिळणार आहे. याचा फायदा घेत स्थानिकांना कंपन्यांनी, उद्योगांनी नोकरी द्यावी. ज्यांच्याकडे कौशल्य नाही ते विकसित करण्यासाठी कौशल्य विकास विभागाला यामध्ये जोडून घेतले असल्याची माहिती सुभाष देसाई यांनी दिली. १०० टक्के स्थानिकांना रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यांना काही कालावाधीसाठी वापरुन घेतले असे होऊ नये. कायमस्वरुपी नोकरी त्यांना मिळाली पाहिजे, असे दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले.

१७ अशी क्षेत्र रोजगारासाठी निवडली आहेत ज्यामध्ये संधी मिळू शकते. ९५० हून अधिक व्यवसाय ज्यामुळे केले जाऊ शकतात. त्यामुळे मागे राहू नये. बेरोजगारी संपवण्याची ही उत्तम संधी असून नोकरी मागणारे आणि देणारे दोघांना एकत्र आणण्याचा आपला प्रयत्न आहे. आम्ही सर्वेक्षण केले असता ५० हजाराहून अधिक रोजगार उपलब्ध आहेत. हे संकेतस्थळ फक्त माहिती देणारे नाही तर ती मिळेपर्यंत यंत्रणा काम करेल. महाराष्ट्रातील रोजगारी संपवण्यासोबत कौशल्य मनुष्यबळ निर्माण करण्यावर आपला भर असेल, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली आहे.

राज्यात लॉकडाऊननंतर सध्या ६५ हजार उद्योग सुरू झाले आहेत. तर अनेक नवे उद्योग येऊ घातले आहेत. राज्य सरकारने नुकतेच देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे १७ हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. त्याचबरोबर नवीन उद्योग सुरू करण्यासाठी महापरवाना देणे सुरू केले आहे. अशा स्थितीत उद्योगांमध्ये कुशल, अर्धकुशल तसेच अ-कुशल कामगारांची मागणी वाढली आहे.

मध्यंतरी कोरोना आजाराच्या संसर्गामुळे कामगारांचे मोठय़ा प्रमाणात स्थलांतर झाले आहे. हे कामगार परत कधी येतील, याची शाश्वती नसल्यामुळे उद्योगांना कामगाराचा तुटवडा भासू नये, तसेच स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी महाजॉब्स हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. यात उद्योग, कामगार व कौशल्ये विकास विभागाने काम केले आहे. महाजॉब्स संकेतस्थळावर रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी केवळ आपली माहिती द्यायची आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्यांकडून इच्छुकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Leave a Comment