कुवेतमधील आठ लाख भारतीय होणार बेरोजगार !


नवी दिल्ली – परदेशी कामगारांशी संबंधित अप्रवासी कोटा विधेयकाच्या मसुद्याला कुवेतमधील संसदेत मंजुरी देण्यात आली असून या विधेयकाचे जर कायद्यात रुपांतर झाले तर सात ते आठ लाख भारतीयांना या विधेयकामुळे देश सोडावा लागू शकतो. मोठ्या प्रमाणात परदेशी कामगार कुवेतमध्ये वास्तव्यास आहेत. ४३ लाख कुवेतची लोकसंख्या असून यापैकी परदेशी कामगारांची संख्या जास्त आहे. कुवेतमध्ये आपलेच नागरिक अल्पसंख्याक होत असून परदेशी कामगारांवर अवलंबून राहण्याची सवय कमी करण्यासाठी तेथील सरकारने आता प्रयत्न सुरु आहेत. यासंदर्भातील वृत्त गल्फ न्यूजने दिले आहे.

घटनेला धरुनच हे विधेयक असल्याचे कायदेशीर आणि विधान समितीने संसदेत सांगितले आहे. या विधेयकानुसार, १५ टक्क्यांहून अधिक भारतीयांची लोकसंख्या असता कामा नये. संबंधित समितीकडे विधेयक वर्ग करण्यात यावे, जेणेकरुन सर्वसमावेशक आराखडा तयार केला जाईल, असे सांगण्यात आले आहे.

जवळपास आठ लाख भारतीयांना या विधेयकामुळे कुवेत सोडावा लागू शकतो. मोठ्या प्रमाणात भारतीय कुवेतमध्ये वास्तव्यास आहेत. जवळपास १५ लाख एवढी कुवेतमधील भारतीयांची संख्या आहे. कुवेतमध्ये भारतीयांनंतर इजिप्तच्या नागरिकांची संख्या सर्वात जास्त आहे.

कुवेतमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे तेथील नागरिक परदेशी प्रवाशांविरोधात आवाज उठवू लागल्यानंतर तेथील स्थानिक प्रशासन आणि सरकारी अधिकाऱ्यांनी कुवेतमधून परदेशी नागरिकांची संख्या कमी करण्यासंबंधी परराष्ट्र मंत्रालयासोबत चर्चा केली. कुवेतचे पंतप्रधान शेख सबा अल खालिद अल सबाह यांनी गेल्या महिन्यात स्थलांतरितांची लोकसंख्या ७० वरुन ३० टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

Leave a Comment