संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकट काळात प्रत्येक देशातील आरोग्य कर्मचारी या संकटाला तेवढ्याच ताकदीने आणि धीराने तोंड देत आहे. यासाठी सर्वच स्तरातून या सर्व कोरोना योद्ध्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी या कर्मचार्यांना अनेक तास पीपीई कीटमध्ये राहूनच रुग्णांवर उपचार करावे लागतात. पण या पीपीई कीटमुळे अंगाची अगदी लाही लाही होते, असा अनुभव डॉक्टर्स सांगत आहेत. पीपीई कीट घातल्यानंतर येणाऱ्या घामामुळे जणू काही आंघोळच केली आहे की काय असा अनुभव आल्याचे डॉक्टरांचे पीपीई कीट काढल्यानंतरचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तरी देखील अशा संकट काळात आपला जीव धोक्यात घालून हे डॉक्टर कोरोनाबाधितांवर उपचार करत आहे. पण सध्याची परिस्थितीत कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकड्यांमुळे डॉक्टरांवरही प्रचंड प्रमाणात मानसिक ताण येत आहे. त्यातच कामाचे वाढीव तास, वाढती रुग्णसंख्या, त्याचबरोबर आपल्या स्वत:च्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी करावी लागणारी धडपड अशा बर्याच गोष्टी डॉक्टरांना हाताळाव्या लागत आहेत. अशातच आता सोशल मीडियात मुंबईतील एका तरुण महिला डॉक्टरने पीपीई कीट घालून डान्स करतानाच एक भन्नाट व्हिडिओ डॉक्टर्स डेच्या दिवशीच पोस्ट करण्यात आला होता. मुंबईमधील रिचा नेगी या महिला डॉक्टरनेच पुढाकार घेतला आहे.
आम्ही स्वत: जरी या गर्मी होणार्या पण तितक्याच सुंदर दिसणार्या पोशाखामध्ये असलो तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही नकारात्मकतेला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचा जीव आम्ही धोक्यात घालून सकारात्मक राहू शकतो. तर तुम्हीही देखील या वाढवलेल्या लॉकडाउनच्या काळात थोडे सकारात्मक राहणे गरजेचे असल्याचे रिचा आपल्या पोस्टमध्ये सांगते. महाराष्ट्रामध्ये डॉक्टर्स डे आणि 1 जुलैपासून महिन्याभरासाठी वाढलेल्या लॉकडाउनची सांगड घालत सर्व सामान्यांना या गोष्टींकडे सकारात्मक नजरेतून पाहा असे आवाहन रिचाने केले आहे.
दरम्यान अनेकांनी तिचा डान्स पाहून तू खरोखर खूप सुंदर नाचते अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. हाय गर्मी या मूळ गाण्यात थिरकलेला अभिनेता वरुन धवननेही या पोस्टवर कमेंट केली असून त्याने फायर आणि हार्टचा इमोन्जी पोस्ट करत रिचाचे कौतुक केले आहे. या व्हिडिओला दोन दिवसांमध्ये ३ लाख ८४ हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.