VIDEO ; भारतीय रेल्वेच्या शेषनागने मोडला सुपर अॅनाकोंडाचा विक्रम


नवी दिल्ली : आपल्या सर्वोत्तम सेवेसाठी भारतीय रेल्वे जगभरात ओळखली जाते. आता याच भारतीय रेल्वेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. 2.8 किमी लांब शेषनाग ही रेल्वे आज रुळावर उतरली. भारतीय रेल्वेने यासोबतच एक विक्रम आपल्या नावे केला आहे. रेल्वेने शेषनाग धावण्यासाठी चार इंजिनचा वापर केला. यासंदर्भात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर विभाग ते कोरबा दरम्यान गुरुवारी 2.8 किमी लांबीची शेषनाग 251 वॅगनसह चालवण्यात आली.


6 तासात शेषनागने 260 किमी अंतराचा प्रवास पूर्ण केला. माल वाहतुकीसाठी लागणारा वेळ वाचवण्यासाठी हा अनोखा प्रयोग करण्यात आला. 6000 हॉर्स पॉवर क्षमता असणारे 4 इलेक्ट्रिक इंजिन शेषनाग ट्रेनला रुळावर चालविण्यासाठी त्यामध्ये बसविण्यात आले होते. याआधी भारतीय रेल्वेचीच सुपर अ‍ॅनाकोंडा ही ट्रेन 2 किमी लांबीची असून यात 6000 हॉर्स पॉवर क्षमता असणारे तीन इलेक्ट्रिक इंजिन बसविण्यात आले होते.

रेल्वेने यासह एका दिवसात सुपर अ‍ॅनाकोंडाचा विक्रम मोडला आहे. रेल्वेने याआधी बुधवारी तीन इंजिन आणि फ्रेट गाड्या जोडून 2 किमी लांबीची सुपर अ‍ॅनाकोंडा ट्रेन तयार केली. ओडिशातील लाजकुरा ते राउरकेला दरम्यान ही सुपर ट्रेन धावली होती. तर आज 2.8 लांबीची शेषनाग ट्रेन धावली. रेल्वेने बुधवारी आपल्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला. 1 जुलै, 2020 रोजी 24 तासांदरम्यान एकूण 201 प्रवासी गाड्या धावल्या आणि सर्व ट्रेन वेळेत पोहचल्या. म्हणजेच तब्बल 201 रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसारच निश्चित स्थानकावर पोहोचल्या. 167 वर्षांनंतर पहिल्यांदाच असा प्रकार घडला.

Leave a Comment