भारताने चिनी अ‍ॅप्सवर घातलेल्या बंदीचे अमेरिकेकडून समर्थन


वॉशिंग्टन – राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव भारताने ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घातली असून, अमेरिकेनेही भारताच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. भारताचे सार्वभौमत्व आणि सुरक्षेला या बंदीमुळे चालना मिळणार असल्याचे मत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी व्यक्त केले. भारताने चीनमधील कम्युनिस्ट पक्षासाठी सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या या अ‍ॅपवर घातलेल्या बंदीचे आम्ही स्वागत करतो. भारताच्या दृष्टीकोनातून या निर्णामुळे सार्वभौमत्वाचे रक्षण होईल, असे त्यांनी एका पत्रकार परिषदे दरम्यान म्हटले आहे.

दुसरीकडे, अमेरिकेच्या काही खासदारांनी भारताच्या या निर्णयानंतर शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅप्सला देशाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचे म्हणत भारतासारखेच पाऊल उचलण्याचे आवाहन केले आहे. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्ताला रिपब्लिकन सिनेटचे सदस्य जॉन कॉर्निन यांनी टॅग केले आहे. भारताने हिंसक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर टीक-टॉक आणि इतर डझनभर इतर अ‍ॅप्सवर बंदी घातल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे रिक क्रॉफर्ड यांनी ट्विट करत टीक-टॉकला अवश्य जायलाच पाहिजे असेही म्हटले आहे. टीक-टॉकचा वापर चीन सरकार स्वत:च्या उद्दिष्टांसाठी करत आहे. अमेरिकन कॉंग्रेसमध्ये अशी किमान दोन विधेयके सध्या प्रलंबित आहेत, त्यामध्ये सरकारच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या फोनवर टीक-टॉक वापरण्यास बंदी घालण्याबाबत म्हटल्याचे गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी असे सांगितले होते.

Leave a Comment