महाराष्ट्रातील कोरोनाचे धक्कादायक वास्तव; महिन्याभरात एक लाखाने वाढले कोरोनाबाधित


मुंबई – देशात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या महाराष्ट्रात कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. महाराष्ट्रात जून महिन्यात तब्बल एक लाख कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात १ लाख ८० हजार २९८ एवढी कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या झाली आहे. ९ मार्च रोजी राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता, तर १७ मार्च रोजी मुंबईत पहिल्या मृत्यूची नोंद झाली होती.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या १ जून रोजी ७० हजार १३ एवढी होती. तर ही संख्या ३० जून रोजी १ लाख ७४ हजार ७६१ वर पोहोचली. म्हणजेच राज्यात एका महिन्यात एक लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्याचबरोबर १ जून रोजी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णसंख्या ४१ हजार ९९ एवढी होती. ही संख्या ३० जून रोजी ७७ हजार ६५८ वर पोहोचली. मुंबईत एका महिन्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत ३६ हजार ५५९ एवढी वाढ नोंदवण्यात आली.

दरम्यान बुधवारी राज्यात ५ हजार ५३७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली. त्याचबरोबर बुधवारी २ हजार २४३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहे, तर आतापर्यंत एकूण ९३ हजार १५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात एकूण ७९ हजार ७५ अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत दिली.

Leave a Comment